पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत पाठ्यपुस्तके; 'चंदगड' चे नियोजन पूर्ण - चंदगड लाईव्ह न्युज

29 July 2021

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत पाठ्यपुस्तके; 'चंदगड' चे नियोजन पूर्ण

पाठ्यपुस्तकांची केंद्रनिहाय विभागणी करताना केंद्रप्रमुख, बी आर सी विषय तज्ञ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

    चंदगड तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक तसेच माध्यमिक शाळांत इयत्ता पहिली ते आठवीत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना यंदाही मोफत पाठ्यपुस्तके मिळणार आहेत. वितरण नियोजन पूर्ण झाले असून येत्या आठवड्याभरात पुस्तके विद्यार्थ्यांच्या हातात पडतील. अशी माहिती गटशिक्षणाधिकारी सौ. एस. एस. सुभेदार व विस्ताराधिकारी एम. टी. कांबळे यांनी दिली.

      कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर शाळा बंद आहेत. पुढील वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना गतवर्षीच्या विद्यार्थ्यांकडील पुस्तके परत घेऊन तीच पुस्तके देण्यात आली होती. त्यामुळे शासनामार्फत दरवर्षी मिळणारी पाठ्यपुस्तके यंदा मिळतील की नाही! याबाबत शिक्षक, पालक व विद्यार्थी वर्गात संभ्रमावस्था होती. तथापि सर्व संकटांवर मात करून महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाने मागील आठवड्यात महाराष्ट्रभर पाठ्यपुस्तके पोहोच केली आहेत. चंदगड तालुक्यात इयत्ता पहिली ते आठवी सर्व विषयांची एकूण सुमारे ७० हजार पुस्तके पोहोच झाली असून ती वितरणासाठी कोवाड येथील श्रीराम विद्यालय व व्ही पी देसाई जुनियर कॉलेजमध्ये ठेवण्यात आली आहेत.          

            सर्व पुस्तकांची विषय, इयत्ता व केंद्र निहाय विभागणी पूर्ण झाली आहे. तथापि मागणीपेक्षा कमी आलेली काही विषयांची पुस्तके दोन दिवसात येणार असून ती येताच तालुक्यातील १९ केंद्रांमध्ये वितरण केले जाईल. अशी माहिती शिक्षण विभाग चंदगड कडून देण्यात आली आहे. पुस्तक विभागणी साठी विषयतज्ञ व विभाग प्रमुख महादेव नाईक व बीएआरसी स्टाफ, कोवाडचे केंद्रप्रमुख सुधीर मुतकेकर, अध्यापक मा. ई. नाईक आदींसह कोवाड, कालकुंद्री, कुदनुर  केंद्रातील प्राथमिक शिक्षक, हायस्कूल शिपाई आदींनी परिश्रम घेतले. याकामी केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत पाटील, श्रीराम विद्यालयचे प्राचार्य एस. एन. पाटील व स्टाफ आदींचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment