कुदनुर येथे ढगफुटी सदृश्य पाऊस, रस्त्याला आले ओढ्याचे स्वरूप - चंदगड लाईव्ह न्युज

06 July 2021

कुदनुर येथे ढगफुटी सदृश्य पाऊस, रस्त्याला आले ओढ्याचे स्वरूप

 कुदनूर येथे ढगफुटी सदृश्य पावसामुळे मुख्य रस्त्याला असे ओढ्याचे स्वरूप आले होते.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

           कुदनुर (ता. चंदगड) येथे आज दिनांक ६ जुलै रोजी दुपारी ३ ते साडेचार दरम्यान आलेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे ग्रामस्थांची एकच तारांबळ उडाली. गावातील सर्वच गल्ल्यांना ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. गावाच्या मध्यभागातून जाणाऱ्या कालकुंद्री ते राजगोळी रस्त्याने पाण्यामुळे अक्राळ-विक्राळ रूप धारण केले होते. या मुख्य रस्त्यावरील अनेक घरांत पाणी घुसल्यामुळे ग्रामस्थांची एकच तारांबळ उडाली. घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले. मुख्य रस्त्यावर पार्क केलेल्या छोट्या चार चाकी वाहनांतही पाणी घुसले. काही धाडसी तरुण व ग्रामस्थ या धोकादायक प्रवाहातून इकडे तिकडे फिरत आनंद लुटताना दिसत होते.

                 गेल्या पंधरा दिवसांपासून दडी मारलेल्या पर्जन्य राजाने परिसरातील कोवाड, कुदनूर, कालकुंद्री आदी गावांच्या परिसरात काल बर्‍यापैकी हजेरी लावली होती. आज मात्र तीच वेळ पकडून विक्राळ रूप धारण केले. कुदनूर सह परिसरातील कालकुंद्री, किटवाड, तळगुळी, कोवाड आदी गावांना पावसाने बऱ्यापैकी तडाखा दिला. मात्र कुदनूर येथे त्याचा जोर अधिकच होता. पावसाअभावी तहानलेल्या भात व अन्य पिकांना आजच्या पावसाने एक प्रकारे जीवदान मिळाले आहे. पावसाच्या अचानक दमदार हजेरीचे परिसरातील बळीराजाने स्वागतच केले आहे.

No comments:

Post a Comment