कोवाड येथे कोरोना हॉटस्पॉट गावांतर्गत ५६७ व्यक्तींची कोरोना तपासणी - चंदगड लाईव्ह न्युज

26 July 2021

कोवाड येथे कोरोना हॉटस्पॉट गावांतर्गत ५६७ व्यक्तींची कोरोना तपासणी

हॉट स्पॉट गावांतर्गत कोवाड मध्ये कोविड चाचणी करताना पथक.(छाया-दर्पण फोटो, कोवाड)

कोवाड : सी. एल. वृत्तसेवा

         कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी चंदगड तालुक्यातील सहा हॉट - स्पॉट गावातील प्रत्येक कुटुंब प्रमुखाची कोरोना तपासणी मोहीम सुरू आहे. याची सुरुवात कोवाड येथून दि. २६ रोजी झाली. सात पथकाद्वारे गावातील ५६७ नागरिकांची कोरोना तपासणी घेण्यात आली.

         चंदगड तालुक्यात दुसऱ्या लाटेत चंदगड, अडकूर, हलकर्णी, तुर्केवाडी, माणगाव व कोवाड या गावामध्ये रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यावर  नियंत्रण मिळवण्यासाठी घर टू घर कोरोना तपासणीचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला होता. याबाबत चंदगड तहसिलदार कार्यालयात प्रशिक्षण देण्यात आले होते. यासाठी कुटुंब संख्येनुसार पथके तयार करण्यात आली आहेत. कोवाड येथे दिवसभरात ५६२ कुटुंबप्रमुखांचे आरटीपीसीआर तर ५ जणांचे रॅपिड अँटिजेंन असे एकूण ५६७ सॅम्पल जमा केले. आरटीपीसीआर सॅम्पल तपासणीसाठी प्रयोगशाळेमध्ये पाठविण्यात येणार असल्याचे यावेळी नायब तहसीलदार संजय राजगोळे यांनी सांगितले. यापुढे कोविड हॉटस्पॉट गावातील ग्रामस्थांनी या तपासणीला सहकार्य करावे असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. के. खोत यांनी केले. यावेळी तहसीलदार विनोद रणावरे, बोडीओ चंद्रकांत बोडरे, कोवाड प्राआ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी प्रसन्नकुमार चौगुले, जि. प. सदस्य कल्लापा भोगण, सरपंच अनिता भोगण, केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत पाटील, मंडलाधिकारी शरद मगदूम, तलाठी दीपक कांबळे, ग्रामसेवक जी. एल. पाटील आदींची उपस्थिती होती. प्रत्येक पथकात ग्रामपंचायत सदस्य, परिसरातील पोलीस पाटील, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, पोलीस यांचा समावेश होता. तपासणी झालेल्या व्यक्तींचा डाटा भरण्याचे काम करण्यासाठी संत गजानन पॉलिटेक्निकचे तंत्रज्ञ व प्राथमिक माध्यमिक शिक्षकांनी केले. याकामी सर्व आरोग्य व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment