रियाज केल्यास यश नक्की मिळते - दत्तात्रय सांवत, अडकूर येथे गुणगौरव सोहळा संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

17 August 2021

रियाज केल्यास यश नक्की मिळते - दत्तात्रय सांवत, अडकूर येथे गुणगौरव सोहळा संपन्न

 

अडकूर येथे कै. तु. धा. कांबळे (गुरुजी) प्रेरणा फाऊंडेशन च्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार करताना डाॅ विजयकुमार कांबळे, बसलेले ह. भ. प. सांवत, माटले.

चंदगड / प्रतिनिधी
       गायन,वादन कलेत पारंगत व्हायचे असेल तर मन लावून रियाज करावा लागतो.चार दोन महिन्यांत किंवा वर्षभरात संगित कला साध्य करता येत नाही.  गुरुनी दिलेला अभ्यास विद्यार्थ्यांनी वेळेत पूर्ण केला तर नक्कीच यश  मिळते,कोणतीही कला असो ती आत्मसात करण्यासाठी  परिश्रम घेतले पाहिजे, असे प्रतिपादन रुपक संगित विद्यालयाचे शिक्षक ह.भ.प.दत्तात्रय सांवत  यांनी  केले. 
      ते अमरोळी येथील कै.तु.धा.कांबळे (गुरुजी) प्रेरणा फाऊंडेशन यांच्या वतीने अडकूर येथील गणेश मंदिरात आयोजित केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभ प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी अनिल माटले होते.
   प्रारंभी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक प्रेरणा फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.विजयकुमार कांबळे यांनी केले. विद्यार्थी, खेळाडू,गायक, वादक यांना प्रोत्साहन देण्यासाठीच  फाऊंडेशनची स्थापना केली असल्याचे सांगितले.
    स्पर्धेमध्ये यश मिळाले म्हणून कलाकाराने जास्त हुरळून न जाता आपले पाय जमिनीवर ठेवून चालावे असे विचार अभिजित पाटणे यांनी व्यक्त केले तबलावादन शिक्षक विद्यार्थ्यांना धडे देत असतात त्या धड्यांची रियाज विद्यार्थ्यांनी एकाग्र चित्ताने केल्यास विद्यार्थी देखील शिक्षकांच्या पुढे जाऊ शकतो मात्र विद्यार्थ्यांनी आई ,वडील,गुरु व श्रोतावर्ग यांचाही सदैव आदर करावा असे  रूपक विद्यालयाचे तबला शिक्षक डॉ कृष्णा होरंबळे यांनी व्यक्त केले.
       याप्रसंगी निलेश अस्वले (झुलपेवाडी)तुषार हनुमंते(उत्तूर)यांनीही मनोगत व्यक्त केले.
         इंटरनॅशनल एकल (ऑनलाइन) तबला वादन स्पर्धा 2021 मध्ये पारितोषिक प्राप्त केलेल्या रुपक संगित  विद्यालयाचे विद्यार्थी कुमार हर्ष अमर जांभळे( उत्तुर) ,स्वप्नील विठ्ठल गडदे (कानडी),व कुमारी काजल लक्ष्मण पाटील (सावर्डे )यांचा तसेच रुपक संगित विद्यालयाचे शिक्षकांचा सत्कार डाॅ विजयकुमार कांबळे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
      शशिकांत वांईगडे , रमेश पाटील ( बोंजूर्डी), बाबूराव पाटील,लक्ष्मण पाटील ( सावर्डे ), उत्तम मेगाणे (आमरोळी), ऋषिकेश माटले (अडकूर) या मान्यवरांसह विद्यार्थी,व पालक उपस्थित होते.
      सूत्रसंचालन  वनिता कांबळे यांनी केले.तर आभार तुषार हणमंते यांनी मानले.



No comments:

Post a Comment