![]() |
व्ही. जी. तुपारे |
कागणी : सी. एल. सेवा /एस. एल. तारीहाळकर
मजरे कार्वे (ता. चंदगड) येथील रहिवासी, खेडूत शिक्षण संस्थेचे कालकुंद्री (ता. चंदगड) येथील सरस्वती हायस्कूल व लोकनेते तुकाराम दत्तात्रय पवार ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य व्ही. जी. तुपारे यांचा मजरे कार्वे येथे वेंगुर्ला ते बेळगाव महामार्गावर अपघाती मृत्यू झाला. या घटनेने चंदगड तालुक्यातील शिक्षण क्षेत्र हळहळून गेले आहे.
यासंदर्भात मिळालेली माहिती अशी -मंगळवार दिनांक १७ रोजी सायंकाळी ६.३० वाजता वॉकिंगला गेले होते. दरम्यान त्यांना माणगाव हून पाटणे फाट्याकडे जाणाऱ्या टेम्पोने त्यांना धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. शिनोळी येथे उपचारासाठी नेण्यात आले होते. पण त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन भाऊ, सून असा परिवार आहे.
![]() |
कालकुंद्री : आदर्शनिय कामगिरी केल्याबद्दल व्ही. जी. तुपारे यांचा सत्कार करताना रा. ना. पाटील. शेजारी आर. आर. देसाई, सुभाष बेळगावकर व अन्य मान्यवर. |
मजरे कार्वे ग्रामपंचायतीच्य माजी सदस्या गीतांजली तुपारे यांचे पती तर चंदगड येथील न्यू इंग्लिश हायस्कूलचे शिक्षक सुरज तुपारे, अभियंता धीरज तुपारे यांचे ते वडील होत. आमरोळी (ता. चंदगड) येथील भावकेश्वर विद्यालयाचे शिक्षक संजय तुपारे यांचे ते बंधू होत. प्राचार्य व्ही. जी. तुपारे गणित विषयाचे तज्ञ होते. एनटीएस परीक्षा विभागाचे ते तालुका प्रमुख म्हणून कार्यरत होते. विविध उपक्रमांमुळे त्यांना बी. जी. काटे आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. चंदगड येथे त्यांनी आपल्या सेवेला प्रारंभ केला. यानंतर भावेश्वरी हायस्कूल (नांदवडे) येथे शिक्षक म्हणून, चंदगड येथे पर्यवेक्षक व मुख्याध्यापक म्हणून काम केले. त्यानंतर ते मांडेदुर्ग येथील हनुमान विद्यालयाचेही मुख्याध्यापकही होते. चंदगड येथे त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल व नरसिंगराव भुजंगराव पाटील ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य पदाची धुरा सांभाळल्यानंतर २०२० पासून त्यांच्याकडे कालकुंद्री येथील सरस्वती हायस्कूल व लोकनेते तुकाराम दत्तात्रय पवार ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य पदाची जबाबदारी सोपवली होती. मंगळवारी सायंकाळी पाच वाजता कामकाज संपवून ते आपल्या गावी गेले होते. या नंतर नेहमीप्रमाणे वॉकिंग करत असताना साडेसहाच्या सुमारास त्यांच्यावर नियतीने घाला घातला. रात्री उशिरा पोस्टमार्टम करून मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यांच्या जाण्याने तालुक्यातील शिक्षण-क्षेत्र हळहळून गेले आहे. विद्यार्थ्यांसाठी तळमळणारे व गावचे नाव मोठे करणारे शिक्षक अचानक गेल्याने मजरे कार्वे गावावरही शोककळा पसरली आहे.
No comments:
Post a Comment