चंदगड' मधील महादेव कोळी जमातीला त्यांचे हक्क मिळवून देणार - आम. राजेश पाटील, कामेवाडीत आदीवासीना अनुदान वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

17 August 2021

चंदगड' मधील महादेव कोळी जमातीला त्यांचे हक्क मिळवून देणार - आम. राजेश पाटील, कामेवाडीत आदीवासीना अनुदान वाटप

कामेवाडी येथे महादेव कोळी आदिवासींना अनुदान वाटप करताना आमदार राजेश पाटील, जि प. सदस्य कल्लाप्पा भोगण आदी मान्यवर.

कालकुंद्री : प्रतिनिधी

चंदगड तालुका व परिसरात राहणाऱ्या कामेवाडी, चिंचणे, कल्याणपुर आदी गावातील महादेव कोळी आदिवासी बांधवांचे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. शासन दरबारी भांडून त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देऊ, असे आश्वासन चंदगड चे आमदार राजेश पाटील यांनी दिले. ते कामेवाडी, ता.चंदगड, येथे आदिवासी 'कोळी महादेव' बांधवांना महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागाच्या वतीने आदिवासी प्रकल्प कार्यालय घोडेगाव व आदिवासी आश्रमशाळा कोते मार्फत खावटी अनुदान व शेतकऱ्यांना "दूधाळ जनावरांचे वाटप कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी जि प सदस्य कल्लाप्पांना भोगण यांची प्रमुख उपस्थिती होती. 

स्वागत जमात मंडळ अध्यक्ष तथा सरपंच बसवानी पाटील व कार्याध्यक्ष शिवलिंग डांगे यांनी केले. प्रास्ताविक महादेव व्हंकळी यांनी केले. यावेळी पुढे बोलताना आम. पाटील म्हणाले गेल्या ७० वर्षापासूनचे या आदिवासींकडील पुरावे पाहता त्यांना हक्कांपासून वंचित ठेवणार ठेवता येणार नाही. यासाठी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करू अशी ग्वाही दिली. यावेळी त्यांनी गावातील अंतर्गत रस्त्यांसाठी दहा लाख तर जि प सदस्य भोगण यांनी सभागृह सुशोभीकरणासाठी निधी जाहीर केला. जिप. सदस्य भोगण, बौद्ध भिक्खू सरोदे आदींची भाषणे झाली. कार्यक्रमास घोडेगाव पुणे येथील प्रकल्प अधिकारी मगदूम, कोलेकर, भाग्यश्री जाधव, तालुका संघ अध्यक्ष तानाजी गडकरी, पशूवैद्यकिय अधिकारी पाटील, पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष श्रीकांत पाटील, वीर राघोजी भांगरे युवक मंडळ अध्यक्ष सुनिल पाटील, किरण पाटील (चिंचणे), सुबराव पाटील (कल्याणपुर), अण्णासो शिरगावे, नागेश मुत्नाळे, प के पाटील, बाळू पाटील, पोलीस पाटील आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरुवातीस गावातील प्राथमिक, माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी आदिवासींच्या वेषात गीते सादर केली. आभार महादेव पाटील यांनी मानले.

 

 पुन्हा वाल्या कोळी होण्याची वेळ आणू नका!

   या कार्यक्रमाला प्रांताधिकारी गडहिंग्लज, चंदगड चे तहसीलदार, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांना निमंत्रित करण्यात आले होते. येण्याचे आश्वासन देऊनही कार्यक्रम स्थळी कोणीही शासकीय अधिकारी आले नाहीत. गेली काही वर्षे तालुक्यातील आदिवासींना शासनस्तरावरून आदिवासी जातीचे दाखले मिळणे बंद आहे. याचा संबंध अधिकारी अनुपस्थिती जोडत येथील तरुण मंडळाने "आम्ही वाल्याचे वाल्मिकी झालो आहोत. पुन्हा 'वाल्या कोळी' होण्याची वेळ आमच्यावर आणू नका!" असा इशारा व्यासपीठावरून आमदारांच्या उपस्थितीतच दिला.




No comments:

Post a Comment