बंद पडलेली हुंदळेवाडी शाळा पुन्हा सुरू होणार का? ग्रामस्थांचा सवाल - चंदगड लाईव्ह न्युज

20 August 2021

बंद पडलेली हुंदळेवाडी शाळा पुन्हा सुरू होणार का? ग्रामस्थांचा सवाल

शाळा सुरू करण्याबाबत सभापती व अधिकाऱ्यांना निवेदन देताना जि प सदस्य कल्लाप्पा भोगण व हुंदळेवाडी ग्रामस्थ

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

       हुंदळेवाडी (ता. चंदगड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पटसंख्येअभावी तीन वर्षांपासून बंद आहे. ही शाळा पुन्हा सुरू होणार का असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे.

         प्रो कबड्डीतील स्टार राष्ट्रीय खेळाडू सुरज व सिद्धार्थ देसाई या बंधूंमुळे हुंदळेवाडी गाव गेल्या चार-पाच वर्षात देशभर चर्चेत आहे. चौथीपर्यंत चे शिक्षण त्यांनी याच शाळेत घेतले होते. तथापि या छोट्याशा गावात विद्यार्थी पटाच्या निकषानुसार शाळा बंद पडली. शिक्षण विभागाने या शाळेचा 'यु डायस कोड' सुद्धा गोठवला आहे. सद्यस्थितीत पहिली ते चौथी चे विद्यार्थी असले तरी शाळे अभावी शिक्षण घेणे मुश्किल झाले आहे. ही कुचंबणा थांबवून शिक्षण विभागाने शाळा सुरू करावी या मागणीसाठी सर्व ग्रामस्थ पंचायत समिती चंदगड कडे निघाले होते. 

         त्याच वेळी वेगळ्या कारणासाठी भागात असलेल्या पं. स. सभापती ॲड. अनंत कांबळे यांनी गटशिक्षणाधिकारी सौ एस एस सुभेदार, शिक्षण विस्ताराधिकारी एम टी कांबळे, ग्रापं. विस्ताराधिकारी आळंदे आदींसह हुंदळेवाडी गावाला भेट दिली. ग्रामस्थांनी या विभागाचे  जिप. तसेच स्थायी समितीचे सदस्य कल्लाप्पांना भोगण यांच्या हस्ते शाळा सुरू करण्याचे निवेदन सभापती व अधिकाऱ्यांना दिले. शाळा पुन्हा सुरू करणे हा राज्य शासनाच्या अखत्यारीतील प्रश्न असून याकामी यश येईपर्यंत पाठपुरावा करण्याचे आश्वासन यावेळी भोगण यांनी दिले. याकामी सर्वतोपरी सहकार्य करु असे सभापती व अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे शाळा सुरू होण्या बाबत आशेचा नवा किरण निर्माण झाला आहे. यावेळी किणी ग्रुप ग्रामपंचायत सरपंच संदीप बिर्जे, ग्रामपं. सदस्य अविनाश देसाई, व. पु. बामणे, व्ही एन देसाई, सुहास बामणे, हेमंत मुरकुटे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment