'गतहारी' ची 'गटारी' करून दीप अमावाम्येला बदनाम करू नका - चंदगड लाईव्ह न्युज

04 August 2021

'गतहारी' ची 'गटारी' करून दीप अमावाम्येला बदनाम करू नकाश्रीकांत पाटील / चंदगड :सी एल वृत्तसेवा

       आषाढ अमावास्ये नंतर श्रावण महिना सुरु होतो. या अमावास्येला दीप अमावास्या किंवा गतहारी अमावास्या म्हटले जाते. पण अलीकडे या नावाचा अपभ्रंश करून तिला 'गटारी' अमावस्या असे संबोधून बदनाम केले जात आहे. हे पुर्णतः चुकीचे असून एनकेन निमित्ताने फोफावणाऱ्या चंगळवादामुळे भारतीय संस्कृती बदनाम होत आहे.

      आषाढ अमावास्येनंतर श्रावण महिना सुरू होतो. या महिन्यात किंबहुना आषाढी एकादशी नंतर चातुर्मासाचा सात्विक काळ सुरू होतो. या काळात काही अन्नपदार्थ (मांसाहार) निषिद्ध मानले जातात. तथापि वर्ज्य असलेले अन्नपदार्थ महिनाभर बंद होण्यापूर्वी शेवटची संधी म्हणून या अमावास्येकडे पाहणाऱ्या महाभागांनी एका चांगल्या दिवसाची गटारी अशी 'संभावना' करून टाकली आहे. यावर्षी ही अमावास्या ७ व ८ ऑगस्ट २०२१ (शनिवार, रविवार) रोजी आहे. मांसाहार करणारे रविवार हा हक्काचा दिवस मानतात. त्यांना तर ही पर्वणीच आहे. या गटारी अमावास्येच्या निमित्ताने मांसाहारावर यथेच्छ ताव मारला जातो. यात सर्व कुटुंब सामील झालेले असते. यासोबत मद्यपान  करणारेही अनेक आहेत. सामाजिक चंगळवादामुळे ही अनिष्ठ प्रथा अधिकाधिक दृढ होत चालली आहे. जिभेचे चोचले पुरवण्यासाठी अनेक जत्रा सुध्दा आषाढाच्या शेवटच्या आठवड्यात होत असतात.

       ही अमावास्या देशभरात विविध नावांनी ओळखली जाते उत्तर भारतात हरियाली, ओरिसामध्ये चितलगी, आंध्र, तेलंगणा मध्ये चुक्कला आदी नावे आहेत. या दिवशी दीप पूजनला महत्त्व असल्यामुळे 'दीप अमावस्या' असेही म्हणतात.

      दुसरीकडे या अमावास्येचे मूळ नाव गतहारी असून हा शब्द शाकाहारी ला समानार्थी असा आहे. श्रावण किंवा चातुर्मासात पचायला जड आहार घेतल्यास अनेक व्याधींना निमंत्रण मिळते. पावसाळ्यातील व्याधींची ब्याद टाळून आपले प्रकृतिमान चांगले ठेवण्यासाठी हलका आहार घ्यावा अशी  प्राचीन मान्यता आणि परंपरा आहे. त्यामुळेच या काळात सण-उत्सव, व्रतवैकल्ये यांची जोड देऊन शाकाहाराला प्राचीन काळापासून धार्मिक आधार देण्यात आला आहे. तथापि आधुनिक काळात काहीतरी 'हटके' करण्याची चढाओढ असल्यामुळे गतहारी चा अपभ्रंश करून गटारी अमावस्या असा शब्दप्रयोग रूढ झाला आहे. (दारू पिऊन गटारीत लोळणे मान्यता प्राप्त? झाल आहे)  यातील चांगल्या गोष्टींचा स्वीकार करून वाईटाला तिलांजली देणे मात्र आपल्याच हातात आहे. 
No comments:

Post a Comment