ढोलगरवाडी येथील नागपंचमीनिमित्त होणारा कार्यक्रम रद्द, सर्पप्रेमी व अभ्यासक शास्त्रीय माहिती पासून राहणार वंचित - चंदगड लाईव्ह न्युज

10 August 2021

ढोलगरवाडी येथील नागपंचमीनिमित्त होणारा कार्यक्रम रद्द, सर्पप्रेमी व अभ्यासक शास्त्रीय माहिती पासून राहणार वंचित

सापांचे संग्रहित छायाचित्र


कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

        कोरोना महामारीच्या वाढत्या प्रकोपामुळे ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथील नागपंचमीनिमित्त १३ ऑगस्ट रोजी सापांबद्दलच्या शास्त्रीय माहितीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. अशी माहिती शेतकरी शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष तथा सर्पालयeचे कार्यकारी संचालक तानाजी वाघमारे यांनी दिली.

        ढोलगरवाडी येथे नागपंचमीनिमित्त गेल्या ६० वर्षांपासून दरवर्षी विविध जातींच्या जिवंत सापांचे दर्शन, त्यांची शास्त्रीय माहिती, सापांबद्दलच्या अंधश्रद्धा, रूढी-परंपरा व अंधश्रद्धा निर्मूलन निरंतर सुरू आहे. तथापि गेली तीन वर्षे ही परंपरा खंडित झाली आहे. सन २०१९ मधील महापूर त्यानंतर गेल्या दोन वर्षात कोरोना आपत्तीच्या कारणाने खंड पडला आहे. पर्यावरण साखळीतील अत्यंत महत्त्वाच्या माहितीपासून सर्प प्रेमी व अभ्यासक वंचित राहिले आहेत.

     तानाजी वाघमारे व त्यांचे सहकारी यांनी हे सर्पालय जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ होण्यासाठी चालवलेल्या खटाटोपाला कोरोनामुळे एक प्रकारे खीळ बसली आहे. लवकरच याकामी शासकीय जमिीन मिळविण्यात यश येईल. चंदगड तालुक्यात सापांविषयीचे पर्यटन स्थळ निर्माण होऊन आद्य सर्पमित्र कै बाबुराव टक्केकर यांचा वसा अधिक जोमाने पुढे चालवला जाईल. यामुळे तालुक्यातील पर्यटनास वाव मिळून रोजगार उपलब्ध होईल असा विश्वास यावेळी तानाजी वाघमारे यांनी व्यक्त केला.

         कार्यक्रम रद्द केल्यामुळे चंदगड तालुक्यात सह महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्यातील सर्प प्रेमी व अभ्यासकांची गैरसोय व हिरमोड झाल्याबद्दल शिक्षण मंडळाने दिलगिरी व्यक्त केली आहे.

No comments:

Post a Comment