......आणि झाडाखाली भरली शाळा, गाव तेथे भागशाळा, प्राचार्य आर. आय. पाटील यांचा अनोखा उपक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

06 August 2021

......आणि झाडाखाली भरली शाळा, गाव तेथे भागशाळा, प्राचार्य आर. आय. पाटील यांचा अनोखा उपक्रम

खालसा कोळींद्रे (ता. चंदगड) येथे  झाडा खाली विद्यार्थ्यांना शिकवताना संजय साबळे हे शिक्षक.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        कोरोना सारख्या महामारीने गेली दिड दोन वर्षे शाळा बंद आहेत. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शासनाच्या नियमांनुसार शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षणाची सुरुवात केली. पण चंदगड सारख्या दुर्गम भागात हा प्रयोग पुरता फसला. कारण बऱ्याच गावात मोबाईल रेंज नाही तर काही मुलांकडे स्मार्टफोन नाहीत. तर लॉक डाऊनमध्ये रोजगार गेल्यामुळे पालकांना रिचार्ज मारायला पैसे मिळत नाहीत.

       नुकताच शासनाने कोरोना मुक्त गावात शाळा सुरू करण्याची परवानगी दिली पण चंदगड सारख्या तालुक्याच्या ठिकाणी दररोज कोव्हीडचे रूग्ण सापडत आहेत. त्यातच तालुक्यातील सर्वात मोठे  दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये क्वांरटाईन कोव्हीड सेंटर असल्यामुळे शाळा सुरू करण्यात अनेक अडचणी येत आहेत. दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सेमी इंग्रजी माध्यमाची सोय असल्यामुळे परिसारातील पंधरा ते वीस गावातील मुले येथे शिकण्यासाठी येतात. लॉक डाऊनमुळे बससेवा बंद आहेत. मुलांचे शैक्षणिक नुकसान नुकसान होऊ नये म्हणून दि न्यू इंग्लिश स्कूलचे प्राचार्य आर. आर. पाटील यांनी परिसरातील गावातील पालकांशी चर्चा करून गावातच मंदिर किंवा झाडाखाली शाळा भरविण्याची कल्पना सांगितली. पालकांनी सुद्धा सर्व सहकार्य केले. वेळापत्रक बनवून दररोज चार शिक्षक गावामध्ये जाऊन अध्यापन करू लागले. पालकांनी खुश होऊन शिक्षकांसाठी चहा नाष्टयाची सोय केली. मुले सुध्दा या झाडाखालच्या निसर्गशाळेत, मंदीरातल्या शाळेत रमू लागली. कोळींद्रे, नागवे, सुळये,  काजिर्णे  इ. गावात हा प्रयोग कमालीचा यशस्वी झाला.

          या भागशाळेसाठी के. एन. सावंत, एन. डी. देवळे, आर. पी. पाटील, टी. व्ही. खंदाळे, बी. आर. चिगरे, संजय साबळे, सूरज तुपारे, एम. व्ही. कानूरकर, जे. जी. पाटील, एस. जे. शिंदे, डी. जी. पाटील, व्ही. के. गावडे, विद्या शिंदे, विद्या डोंगरे, वर्षा पाटील यांनी परिश्रम घेतले. दि न्यू इंग्लिश स्कूलच्या या उपक्रमाची शिक्षण शिक्षण विस्तार अधिकारी एम. टी. कांबळे  यानी दखल घेऊन कौतुक केले.

No comments:

Post a Comment