चंदगड तालुका शिक्षक परिषदेने शिक्षक, शेतकरी व व्यापारी यांच्या प्रश्नांना फोडली वाचा - चंदगड लाईव्ह न्युज

05 August 2021

चंदगड तालुका शिक्षक परिषदेने शिक्षक, शेतकरी व व्यापारी यांच्या प्रश्नांना फोडली वाचा

तहसिलदार विनोद रणवरे यांना निवेदन देताना प्राचार्य आर. आय. पाटील, टी. टी. बेरडे, संजय साबळे आदी. 

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

       माध्यमिक शिक्षक, विद्यार्थी, पालक व पुरग्रस्त शेतकरी, व्यापारी यांच्या विविध मागण्यांचे निवेदन आज महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मार्फत चंदगडचे तहसिलदार विनोद रणवरे यांच्याकडे देण्यात आले.

     कोरोना काळात मृत्यूमुखी पावलेल्या शिक्षकांच्या वारसांना अनुकंपा तत्वांवर नोकरित सामावून घेण्या विषयी सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा. कोरोनाचे सर्व नियमांना अधिन राहून विनाविलंब शाळा सुरू करण्यास परवानगी द्यावी. गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी शासनाने  स्मार्टफोन व रिचार्चचा खर्च दयावा. पूरग्रस्त, भूस्खलन भागातील विद्यार्थाची शैक्षणिक फी माफ व्हावी. पूरग्रस्त शेतकरी, व्यापारी यांना तातडीने आर्थिक मदत दयावी. मागील वर्षीची कर्जासाठी शेतकऱ्यांना सरसकट पन्नास हजाराची जाहिर केलेली रक्कम त्वरीत मिळावी.

   शिक्षकांना अशैक्षणिक कामातून सूट मिळावी. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा शासनाच्या नियमानुसार त्वरीत भरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याची कोव्हीड१९  ची बिले त्वरीत मंजूर होऊन मिळावी. १ नोव्हेंबर २००५ पूर्वीची जूनी पेन्शन योजना लागू करणे, शिक्षकेत्तर कर्मचारी भरती, कोरोना कामगिरीवर असताना विमा सरंक्षण, विना अनुदान शाळांना अनुदान मिळणे, संगणक शिक्षकांना सेवेत सामावून घेणे, ग्रंथपालांच्या मागण्या, सातवा वेतन .आयोग थकलेला हप्ता देणे, अशैक्षणिक कामांतून शिक्षकांची मुक्तता, कॅशलेश व आरोग्य विमा लागू करणे इ.३२ मागण्यांचे निवेदन संघटनेमार्फत चंदगड तहसिलदार कार्यालयात देण्यात आले.

       माध्यमिक शिक्षक व शेतकऱ्यांचे प्रश्न परिषदेमार्फत पोटतिडकिने मांडण्यात आले. यावेळी प्राचार्य आर. आय. पाटील, जिल्हा उपाध्यक्ष टी. एल. तेरणीकर, परिषदेचे अध्यक्ष टी. टी. बेरडे, उपाध्यक्ष मनोहर भुजबळ, एम. एन. शिवणगेकर, सचिव संजय साबळे, खजिनदार पी. वाय. पाटील, सुभाष बांदिवडेकर, सुरेश हरेर, डी. जी. पाटील, एन. डी. देवळे, व्ही. जी. पाटील उपस्थित होते.


No comments:

Post a Comment