वाहून गेलेला कुदनुर रस्ता वाहतुकीस धोकादायक, शेतीचेही मोठे नुकसान - चंदगड लाईव्ह न्युज

26 August 2021

वाहून गेलेला कुदनुर रस्ता वाहतुकीस धोकादायक, शेतीचेही मोठे नुकसान

ओढ्याच्या पाण्यामुळे वाहून धोकादायक बनलेला कालकुंद्री- कुदनूर रस्ता व नजीकच्या शेतीचे नुकसान.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

          गत महिन्यात पुरात वाहून गेलेला कालकुंद्री- कुदनूर रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. संबंधित शासकीय विभागाने या रस्त्याची तात्काळ डागडुजी करावी. तसेच दरवर्षी होणारे रस्ता व शेतीचे नुकसान टाळण्यासाठी  कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे.

       होसुर आणि कर्नाटकातील हांदिगनूर कडून येणाऱ्या ओढ्यांवर किटवाड नजीक कृष्णा खोरे योजनेतील दोन धरणे बांधली आहेत. मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत दोन्ही धरणे ओव्हरफ्लो झाली. याचे एकत्रित पाणी कालकुंद्री, कुदनूर शिवारातून वाहणाऱ्या ओढ्यातून ताम्रपर्णी नदीला मिळते. अतिवृष्टीत ओढ्याच्या पाण्याचा झोत इतका प्रचंड होता की पाणी ओढा पत्रातून बाहेर पडून कालकुंद्री कडील बाजूस अर्धा किमी शिवार व कुदनूर रस्त्यावरून वाहत होते. 

        यामुळे रस्त्याखालील शेतीसह रस्त्याचेही मोठे नुकसान झाले आहे. गेल्या वीस-पंचवीस वर्षांत अनेक वेळा असे घडले आहे. येथे किमान वीस फूट रुंद असलेला रस्ता आता जेमतेम आठ- दहा फूट रुंदीचा शिल्लक राहिला आहे. यामुळे यावरून वाहतूक धोकादायक बनली आहे. रात्रीच्या वेळी अनोळखी वाहनधारकांना अपघातांचा संभव बळावला आहे. रस्त्याची तात्काळ डागडुजी करून उन्हाळ्यात यावर कायमस्वरूपी उपाय योजना करावी व दरवर्षी होणारे नजीकच्या शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळावे अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment