दुंडगे- कामेवाडी रस्त्याची दुरावस्था, खड्ड्यांमुळे वाहनधारक प्रवाशी हैराण - चंदगड लाईव्ह न्युज

25 August 2021

दुंडगे- कामेवाडी रस्त्याची दुरावस्था, खड्ड्यांमुळे वाहनधारक प्रवाशी हैराण

दुंडगे ते कामेवाडी रस्त्याची खड्ड्यांमुळे झालेली दुर्दशा.

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

        दुंडगे ते कामेवाडी रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्याच्या झालेल्या दूर्दशेमुळे प्रवासी व वाहनधारकांचे हाल होत आहेत. रस्त्याची दुरुस्तीसह तात्काळ नव्याने बांधणी करण्याची मागणी होत आहे.

      तांबूळवाडी फाटा ते दड्डी घटप्रभा नदी पर्यंतचा हा रस्ता दहा-बारा वर्षांपूर्वी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून तयार करण्यात आला होता. यातील चंदगड तालुक्याच्या पूर्व भागातील अत्यंत वर्दळीच्या व महत्त्वाच्या दुंडगे ते कामेवाडी बंधारा पर्यंत सात-आठ किलोमीटर किमी रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. गेल्या तीन-चार वर्षात रस्ता दुरुस्तीची मागणी होऊनही खड्डे सुद्धा बुजवण्यात आलेले नाहीत. या रस्त्यावरून ओलम शुगर कडे चंदगड, माणगाव परिसरातून येणारा ऊस व चिंचणे, राजगोळी, तीरमाळ परिसरातून बारमाही अवजड वाहनातून सुरु असलेली वाळू वाहतूक यामुळे रस्ता लवकर खराब होत असून दर्जेदार बांधणी करण्याची गरज आहे मागणी आहे.

          नुकत्याच कामेवाडी येथे झालेल्या एका कार्यक्रमात तालुक्याचे आमदार राजेश पाटील यांनी या कामासाठी स्वतःच्या व खासदार संजय मंडलिक यांच्या फंडातून ३० लाख रुपये मंजूर झाल्याचे सांगितले. त्यामुळे पावसाळा संपताच रस्त्याचे रूप पालटण्याची शक्यता निर्माण झाली असली तरी याबाबतची कार्यवाही लवकर व्हावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment