अन... कित्येक दिवसांनी कानावर पडला "आयमोम धिन " चा घोष, माणगाव येथे उत्साहात मोहरम साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

19 August 2021

अन... कित्येक दिवसांनी कानावर पडला "आयमोम धिन " चा घोष, माणगाव येथे उत्साहात मोहरम साजरा

माणगाव येथे सजवलेला ताबुत

चंदगड / प्रतिनिधी 

        माणगाव (ता. चंदगड) येथील श्री माणकेश्वर मंदीराच्या प्रांगणात मुस्लीम बांधवांनी मोहरम सण पारंपारीक पद्धतीने  साजरा केला. गेले कित्येक वर्ष ही परंपरा खंडीत झालेली होती. सुंदर आरास केलेला ताबूत, त्यात पीरांच्या पंज्यांची स्थापना, चाबकांचे फटकारे, आयमोम धीन चा स्वर आणि कव्वाल्या आणी भवताली सर्व जातीधर्माचे प्रेक्षक! मुस्लीम सण पण त्यात पूर्वी हिंदू सुद्धा उत्साहात सहभागी होत असत व मोहरमची गाणी सुद्धा म्हणत असत. त्यातील काही ओळी ऐकल्या  तर कोणालाही आश्चर्य वाटेल!

ताबुत मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले मुस्लिम बांधव.

 *" माणगाव गाव दिसे गुलजार ,* 

 *कसं तरलं रं पाण्यावरं.* 

 *माणकेश्वराने आधार दिला ,* 

 *बंद केली पाण्याची धारं"* 

    तुम्हालाही आश्चर्याचा सुखद धक्का बसला ना! धार्मिक सौहार्द हा माणगावचा स्थायीभाव आहे. माणकेश्वर मंदीराच्या बारा बलुतेदार वर्षीलदारापैकी एक वर्षीलदार मुसलमान  समाजाचा आहे. नवरात्रात माणकेश्वर  मंदीरा भोवती देव माणकेश्वराचा छबीना (सबीना) फिरतो तेव्हा मुसलमान समाजाचा वांजत्री ढोल ताशा वाजवुण देवाच्या चरणी सेवा रुजू करतो. सीमोलंघनानंतर माणकेश्वराची वाजत गाजत ग्राम प्रदिक्षणा दैवांच्या समवेत होते. तेव्हा मुस्लीम वाजंत्री इमानाने सेवा बजावतो. सर्वधर्म सहिष्णुता, जातीय सलोखा माणगावच्या मातीतच रुजलेला आहे. हिंदू, मुस्लीम,  ख्रिस्ती, बौद्ध इतकेच काय निधर्मी (secular) विचारसरणीचे लोक इथे गुण्यागोविंदाने राहतात. हेच तर माणगावचे मोठेपण आहे ना! म्हणूनच तर माणगाव म्हणजे "मानाचे गाव" आणि धन्य इथली सर्वसमावेशक संस्कृती !

                                            बातमी सौजन्य - समीर पिसाळ, माणगाव
No comments:

Post a Comment