कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करा : पोलिस उपअधिक्षक जयश्री गायकवाड, चंदगडला गणेश मंडळ पदाधिकारी व पोलिस पाटील बैठक - चंदगड लाईव्ह न्युज

27 August 2021

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करा : पोलिस उपअधिक्षक जयश्री गायकवाड, चंदगडला गणेश मंडळ पदाधिकारी व पोलिस पाटील बैठक

 

चंदगड येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या पोलिस पाटील व पदाधिकारी यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना पोलिस उपअधिक्षक जयश्री गायकवाड, बसलेले तहसीलदार रणवरे, बी. डी. ओ बोडरे, डीवायएसपी इंगळे, पो. नि. तळेकर.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          चंदगड तालुक्यात नियम, कायदे पाळून समाजपयोगी काम करणारी गणेश मंडळे आहेत. त्यामुळे संवेदनशील गावाच्या यादीत तालुक्यातील एकाही गावाचा समावेश नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक  साधेपणाने डॉल्बी व वाद्यरहित साजरा करावा असे आवाहन पोलिस उपअधिक्षक जयश्री गायकवाड यांनी केले.

    चंदगड येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील गणेशमंडळाचे पदाधिकारी व पोलिस पाटील यांची संयुक्त बैठक घेण्यात आली.त्यावेळी त्या बोलत होत्या.

        प्रारंभी स्वागत पो. नि. बी. ए. तळेकर यांनी करून शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार आगामी गणेशोत्सव डॉल्बी व वाद्यविरहित साजरा करुन एक गाव एक गणपती साजरा करण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न करण्याच्या सुचना यावेळी चंदगड पोलिस ठाण्याचे निरिक्षक तळेकर यांनी दिल्या. यावेळी डिवायएसपी गणेश इंगळे यानी यावर्षीचा गणेशोत्सव देखील मर्यादित स्वरुपात साध्या पद्धतीने साजरा करायचा आहे. शासनाने कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियमानुसार मुर्तीची उंची, मंडप, गणेश मंडळांना घालून दिलेले नियम यांचे पालन करावे. मिरवणूकीवर बंदी असून डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन केले.

          तहसिलदार विनोद रणवरे यांनी कोरोनाचे संकट अजूनही टळले नसून तज्ज्ञांनी तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. त्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव काळात नागरिकांनी तसेच गणेश मंडळांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण होणे आवश्यक असल्याचे  सांगितले. तर एक गाव एक गणपती साजरा करण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहनही केले. 

          गटविकास अधिकारी चंद्रकांत बोंडरे यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्व मंडळांनी, नागरिकांनी प्रयत्न करावा. शक्यतो प्लॅस्टरच्या मुर्ती न घेता शाडू मातीच्या मुर्तींना प्राधान्य द्यावे असे सांगितले. यावेळी हवालदार रावसाहेब कसेकर, महेश बांबळे, नांगरे, कोकेकर, जाधव पो. हे. कॉ. गुरव, वैभव गवळी, अष्टेकर, राज किल्लेदार, सूतार, पाटील, सायेकर, शिंदे यांचेसह पदाधिकारी, पोलीस पाटील उपस्थित होते. आभार पोलिस निरिक्षक तळेकर यांनी मानले.

No comments:

Post a Comment