रवळनाथ हाउसिंग फायनान्स सोसायटीच्या बेळगाव शाखेचा 100 कोटी रुपयांच्या व्यवसायाचा संकल्प - प्राचार्य आनंद मेणसे यांची माहिती - चंदगड लाईव्ह न्युज

22 September 2021

रवळनाथ हाउसिंग फायनान्स सोसायटीच्या बेळगाव शाखेचा 100 कोटी रुपयांच्या व्यवसायाचा संकल्प - प्राचार्य आनंद मेणसे यांची माहिती

 बेळगाव शाखेचा पाचवा वर्धापन दिन उत्साहात

बेळगाव : शाखा वर्धापन दिन कार्यक्रमात उपस्थित प्राचार्य आनंद मेणसे, माधुरी शानभाग, दीपक कोले आदी.


कागणी : सी. एल.   वृत्तसेवा

      गडहिंग्लज येथील श्री रवळनाथ को. ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटीच्या बेळगाव शाखेने गत पाच वर्षात गृहबांधणी क्षेत्रात चांगले कार्य करून बेळगाव जिल्ह्यात नावलौकिक मिळवला आहे. 31 ऑगस्ट 2021 अखेर शाखेकडे  853 सभासद असून 17 कोटीच्या ठेवी व 52 कोटी रुपयांचे कर्ज वाटप केल्याची माहिती शाखा चेअरमन प्राचार्य आनंद मेणसे यांनी दिली. तसेच सध्या कोरोना महामारीच्या काळातही संस्थेची यशस्वी घोडदौड चालू आहे. संस्थेचे संस्थापक चेअरमन एम. एल. चौगुले व शाखेकडील सर्व सल्लागार यांच्या साथीने व कर्मचाऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करून येणाऱ्या पुढील काही वर्षांमध्ये शाखा 100 कोटींची करण्याचा मानस देखील त्यांनी बोलून दाखविला आहे. ते रवळनाथ हाऊसिंग फायनान्स सोसायटीच्या सभागृहात वर्धापनदिन कार्यक्रमात बोलत होते.                         

        यावेळी शाखा सल्लागार चिदंबर मुनवळी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. त्यात ते म्हणाले की, संस्थेचा पारदर्शक कारभार, तत्पर सेवेमुळे सरकारी बँकाच्या तुलनेत 'रवळनाथ' ने बँकिंग क्षेत्रात एक वेगळा ठसा उमठविला आहे.

       तत्पूर्वी सकाळी शाखा सल्लागार चिदंबर मुनवळी यांच्या हस्ते रवळनाथ देव प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून शाखा सल्लागार प्राचार्य माधुरी शानभाग, शाखा सल्लागार डॉ. अनुपमा धाकोजी, सल्लागार प्रा. डॉ. संदीप देशपांडे, प्रा. डॉ. अमित चिंगळी, भैरू पाटील, सभासद सौ. वंदना मुनवळी, किर्तीकुमार दोषी, अन्य सभासद, ठेवीदार व कर्मचारी यांची उपस्थिती होती. यावेळी प्रास्ताविक प्रा. डॉ. संदीप देशपांडे यांनी केले असून आभार शाखाधिकारी दिपक  कोले यांनी मानले.

No comments:

Post a Comment