![]() |
संग्रहित छायाचित्र |
चंदगड / प्रतिनिधी (नंदकुमार ढेरे)
चंदगड तालुक्यात महिन्याभरापूर्वी आगमन झालेला जंगली टस्कर हत्ती तालुक्यातील उमगांव येथे स्थिरावला असून दिवसा जंगल क्षेत्रात मुक्काम करुन रात्रीच्यावेळी जंगलक्षेत्राबाहेर पडून लगतच्या शेत शिवारात या टस्कराकडून मोठया प्रमाणात पिकांचे नुकसान सूरू आहे. शेतशिवारात सद्या पोटरीला (पोसावण्याच्या स्थितीत) आलेल्या भात पिक, पूर्ण वाढ झालेला ऊस नाचनी या पिकांची मोठया प्रमाणात नुकसान केले आहे. टस्कराने भात आणि ऊस पिकांचे शिवारात घुसुन, खाऊन तुडवुन व लोळवुन मोडतोड करुन नुकसान करत आहे.
वनविभागाकडुन नुकसानग्रस्त क्षेत्राची पहाणी करुन क्षेत्र भेट देऊन पचनामे करण्याची कार्यवाही सुरु आहे. वनक्षेत्रपाल नंदकुमार भोसले, वनपाल दयानंद पाटील, वनमजूर गुंडू देवळी व नितीन नाईक यांचे पथकाने उमगांव, धुरीवाडी, सावताचीवाडी येथील पिकनुकसानीची पाहणी केली. उमगांव पैकी धुरीवाडी येथील गोविंद गावडे याचे भात, नाचना व शेतातील घर, ज्ञानेश्वर गावडे, रामभाऊ धुरी, एकनाथ धुरी, अर्जुन धुरी यांचा ऊस, संजीवनी धुरी, भारत गावडे यांचे नाचना पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. हत्ती कडून नुकसान झालेल्या भात, ऊस व नाचना या पिकांचे नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत. वनविभागाकडून धुऱ्याचीवाडी, हेरे, जांबरे, खा.खुडवळे येथे हत्ती नेहमी येणाऱ्या वाटेवर जंगलाचे दिशेने मधमाशांचे आवाज करणारे स्पिकर बसवण्यात आले असुन हत्तीच्या कळपाला जंगलक्षेत्रात रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत असे वनक्षेत्रपाल नंदकुमार भोसले यांनी सांगितले.
हत्तीच्या कळपास रोखण्यासाठी व त्यावर पाळत ठेवण्यासाठी चार कर्मचाऱ्यांची गस्त पथक तयार करण्यात आले आहेत. गस्त पथकाला फटाके, सुरबाण, मेगाफोन देण्यात आले आहेत. परंतु सदया असलेले पावसाळी वातावरण आणि दाट धुके, अडचणीच्या वाटा यामुळे गस्त पथकास टस्कराला उसकावणे कठीण बनत आहे.
नुकसान भरपाईसाठी आंदोलनाचा इशारा
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाांचे त्वरीत पंचनामे केले जात नाहीत त्यामुळे शेतकरी संतापले आहेत. नुकसानग्रस्त पिकांची नुकसानभरपाई त्वरीत द्यावी अन्यथा वन खात्याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे तालुका उपाध्यक्ष माजी सरपंच सटूप्पा पेडणेकर यांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment