निवडणूक विभागामार्फत घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा, 'उत्सव गणेशाचा, जागर मताधिकाराचा', कशी आहे स्पर्धा, जाणून घ्या......... - चंदगड लाईव्ह न्युज

09 September 2021

निवडणूक विभागामार्फत घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा, 'उत्सव गणेशाचा, जागर मताधिकाराचा', कशी आहे स्पर्धा, जाणून घ्या.........

घरगुती गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी होण्यासाठी हा QR Code स्कॅन करून अर्ज भरावा.

कालकुंद्री : (श्रीकांत पाटील) सी. एल. वृत्तसेवा

              विघ्नहर्त्या श्री गणेशाचा उत्सव भक्तांच्या घरी मंगलमय वातावरणात चैतन्य व भरभराट घेऊन येत आहे. महाराष्ट्रावरील कोरोनाचे सावट अद्यापि संपलेले नाही. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश मंडळांच्या देखाव्यांवर बंधने आहेत. मात्र घरोघरी उत्साहाने लहान-मोठे देखावे, आरास, सजावट करून श्री गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित केला जातो. ही बाब लक्षात घेऊन गणेशोत्सवाची सांगड  निवडणूक आयोगामार्फत सुरू असलेल्या मतदार यादी विशेष पुनरिक्षण मोहीमेशी घालण्याचा निश्चय निवडणूक विभागाने केला आहे. याचाच एक भाग म्हणून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय महाराष्ट्र व बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील तमाम गणेश भक्तांसाठी  'उत्सव गणेशाचा जागर मताधिकाराचा' या विषयावर घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

              "मताधिकार हा १८ वर्षांवरील नागरिकांचा कायदेशीर अधिकार आहे. त्यासाठी पात्र नागरिकाने आपले नाव मतदार यादीत नोंदविणे आणि मताधिकार बजावणे." हे सूत्र केंद्रस्थानी ठेवून गणेश मखर सजावट, गणेश दर्शनासाठी घरी येणाऱ्या भाविकांत मतदार नोंदणी व मतदान हक्क बजावणे बाबत जागरूकता निर्माण करणे, मतदान करताना पैसे व इतर आमिषांना बळी न पडणे, धाक दडपशाहीचा प्रतिकार करणे, जात, धर्म, पंथ न पाहता लोकप्रतिनिधी निवडणे. असे विषय अभिनव व नाविन्य पूर्ण कल्पनेतून घेता येतील.

स्पर्धेची नियमावली :  

१- स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे.

२- स्पर्धेत भाग घेण्यासाठी स्पर्धकाने पुढील साहित्य पाठवावे- १) सजावटीचे विविध अँगलने काढलेले पाच फोटो. २) फोटो मूळ स्वरूपातील असावेत. (कोणाचेही नाव, लोगो न जोडलेले). ३) प्रत्येक फोटो जास्तीत जास्त 200 KB व JPG  फॉरमॅटमध्ये असावा. पाचही फोटोंची एकत्रित साईज 1 MB पेक्षा जास्त असू नये. ४) सजावटीचा व्हिडिओ अर्धा ते एक मिनिटाचा असावा. ५) व्हिडिओ अपलोड करताना एडिटिंग करू नये. चित्रीकरण करताना देखाव्याचे बोलत वर्णन केल्यास चालेल.  ६) व्हिडिओ ची साईज जास्तीत जास्त 100MB व MP4 फॉर्मेट मध्ये असावी. 

३- स्पर्धेसाठी निश्चित केलेल्या विषयावरील ५ फोटो आणि व्हिडिओ पाठवणारा स्पर्धकच ग्राह्य ठरेल. 

४- आपले फोटो आणि व्हिडिओ https://forms.gle/6TxQHaKSAhZmBbQFAया गुगल अर्जावरील माहिती भरून त्यावर पाठवावेत.

५-  फोटो किंवा व्हिडिओ पाठवण्यास समस्या आल्यास अविराज मराठे (मो.न. 7385769328) व प्रणव सलगरकर ( मो.नं. 8669058325) या व्हाट्सअप नंबरवर मेसेज पाठवून विचारावे.

६- दिनांक १० सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०२१ या काळात आलेले साहित्य स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाईल.

७- स्पर्धेसाठी बक्षिसे : प्रथम क्रमांक- २१०००/-, द्वितीय क्रमांक- ११०००/-, तृतीय क्रमांक- ५०००/-, उत्तेजनार्थ क्रमांकासाठी १०००/- रुपयांची एकूण १० बक्षिसे.

८- सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल.

९- सर्वोत्तम सजावटी निवडण्याचा अंतिम निर्णय परीक्षक आणि आयोजक यांच्याकडे राहिल. 

१०- स्पर्धकाने पाठवलेल्या साहित्यावर अन्य कुणी स्वामित्व अगर हक्क सांगितल्यास त्याची  जबाबदारी संबंधित स्पर्धकाची राहील.

११- स्पर्धेतील उत्कृष्ट साहित्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती यांच्या समाज माध्यमांवर प्रसारित केले जाईल.

                या स्पर्धेबरोबरच सार्वजनिक गणेश मंडळांमार्फत निवडणूक आयोगाचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम तसेच मतदार नाव नोंदणी आणि वगळणी यासाठी प्रसार-प्रचार केला जाणार आहे. गणेश मंडळांच्या मंडपात आणि ऑनलाईन माध्यमांद्वारेही जागृती केली जाणार आहे. मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर यांनी  तसेच गडहिंग्लज उपविभागातून जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी केले आहे.

            दिनांक १ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रम दि. १ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू होत आहे या मध्ये १ जानेवारी २०२२ पूर्वी अठरा वर्षे पूर्ण होणाऱ्या(दि ३१ डिसेंबर २००३ किंवा त्यापूर्वी जन्म असणारी सर्व मुले मुली) नव्या मतदारांची नोंदणी होईल.

No comments:

Post a Comment