आई-वडिलांच्या स्मृतिदिनी विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप! सुंडीतील कांबळे कुटुंबियांचा उपक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

24 September 2021

आई-वडिलांच्या स्मृतिदिनी विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप! सुंडीतील कांबळे कुटुंबियांचा उपक्रम

 

संत तुकाराम हायस्कूल सुंडी येथील विद्यार्थ्यांना सायकली प्रदान करताना मान्यवरांसह कांबळे कुटुंबीय.

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

         आई-वडिलांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना सायकली वाटून सुंडी (ता. चंदगड) येथील कांबळे कुटुंबीयांनी  त्यांच्या स्मृतींना अनोखी आदरांजली वाहिली. गुंडूराव यल्लाप्पा कांबळे (मुख्याध्यापक, विद्यामंदिर निढोरी, ता. कागल) व तुकाराम कांबळे (सेवानिवृत्त ऑनररी कॅप्टन) बंधूंनी  आपल्या गावातील संत तुकाराम हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना मोफत सायकलींचे वाटप केले. शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष एन एम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पं स. शिक्षण विस्तार अधिकारी एम. टी. कांबळे  उपस्थित होते.  

         यावेळी बोलताना गुंडूराव कांबळे म्हणाले, ``आमच्या शिक्षणासाठी वडिलांनी दुसऱ्याच्या घरी घरगडी म्हणून खडतर परिश्रम घेत आम्हाला घडवले. याची जाणीव ठेवून त्यांच्या स्मृतिदिनी गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्याचा निर्णय आम्ही घेतला. संत तुकाराम हायस्कूल मध्ये परगावाहून चालत येणाऱ्या पाच गरजू विद्यार्थ्यांना यावेळी सायकली प्रदान करण्यात आल्या.  कार्यक्रमास हायस्कूलचे मुख्याध्यापक एस डी घोळसे, झि नि पाटील, एन एन पाटील, शंकर पाटील, तानाजी टक्केकर, सदाशिवराव देसाई, भीमशक्ती संघटना गडहिंग्लज चे अध्यक्ष भीमराव मोहिते, संजय कांबळे, अंकुश कांबळे, परशराम कांबळे, राजेंद्र कांबळे आदींसह शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन व्ही. बी. केसरकर यांनी केले. आभार संजय पाटील यांनी मानले. या लोकाभिमुख उपक्रमाबद्दल कांबळे बंधुंचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment