कुदनूर- हंदिगनूर 'राज्य' मार्गाची व्यथा संपणार तरी कधी? - चंदगड लाईव्ह न्युज

27 September 2021

कुदनूर- हंदिगनूर 'राज्य' मार्गाची व्यथा संपणार तरी कधी?

शिवारात जाणाऱ्या पाणंदीपेक्षा वाईट अवस्था झालेला कुदनूर- हांदिगनूर राज्यमार्गावर पावसामुळे साठलेली डबकी.


कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

           कुदनूर- हंदीगनूर या महाराष्ट्र-कर्नाटक राज्यांना जोडणाऱ्या रस्त्याची गेल्या काही वर्षात अक्षरशः दुर्दशा झाली आहे. रस्ता डांबरीकरणासाठी निधी मंजूर झाल्याच्या बातम्या अधून-मधून येत असल्या तरी प्रत्यक्षात काहीच कार्यवाही नाही. रस्त्याचे काम तात्काळ सुरू न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. 

         चंदगड तालुक्याच्या पूर्व भागातील हा अत्यंत महत्त्वाचा रस्ता असला तरी स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांत दुर्लक्षितच राहिला आहे. एकूण सहा किमी लांबीच्या रस्त्याचा चंदगड तालुक्यात (महाराष्ट्र) चार किमी तर उर्वरित दोन किमी भाग कर्नाटकात येतो. दोन्ही रस्त्यावरील खाचखळगे, रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या धरणांतून पाणी उपसा साठी मारलेल्या पाईपलाइनच्या चरींमुळे कोणताही वाहनधारक इकडून जाण्याचे धाडस करत नाही. त्यामुळे कोवाड, कालकुंद्री, कुदनूर, दुंडगे, तेऊरवाडी परिसरातील ग्रामस्थ प्रवाशांना हंदिगनूर, केदनूर, काकती, कडोली, बेळगाव सीमाभागात जाण्यासाठी दहा पंधरा किमी जादाचा फेरा मारून जावे लागते. यात वेळ, पैसा, शारीरिक, मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या काही वर्षात महाराष्ट्र व कर्नाटकच्या लोकप्रतिनिधींकडून याबाबत रस्ता करणार, निधी आला आहे, अशा बातम्या येत असल्या तरी प्रत्यक्षात रस्त्याची दुरावस्था संपलेली नाही. सद्यस्थितीत खड्डे व चिखलामुळे वाहने घसरून अनेक छोटे-मोठे अपघात घडत आहेत.

         दोन्ही बाजूंनी झालेली अतिक्रमणे काढून रस्ता रुंदीकरण, खडीकरण व डांबरीकरण सुरू न केल्यास आंदोलनाचा इशारा कुदनूर व परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे. एकदा महाराष्ट्रातील रस्ता झाल्यास कर्नाटक हद्दीतील दुरावस्थेतील एक किमी अंतराच्या रस्त्यासाठी तगादा लावता येईल असे दोन्ही राज्यातील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

No comments:

Post a Comment