जिद्द्, धैर्य आणि अभ्यासात सातत्य ठेवले तर जीवनात यशस्वी होता येते - डॉ. वैभव पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

23 September 2021

जिद्द्, धैर्य आणि अभ्यासात सातत्य ठेवले तर जीवनात यशस्वी होता येते - डॉ. वैभव पाटील


श्री सिद्धेश्वर हायस्कूल कुदनुरच्या वतीने डॉ. वैभव पाटील यांचा सत्कार करताना प्राचार्य आर. डी. कुंभार

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

         जिद्द्, धैर्य आणि अभ्यासात सातत्य ठेवले तर जीवनात यशस्वी होता येते, असे विचार आयर्लन्ड येथून पीएचडी मिळवलेला व श्री सिद्धेश्वर हायस्कूल कुदनुरचा माजी विद्यार्थी डॉ. वैभव पाटील यानी व्यक्त केले. 

     श्री सिद्धेश्वर हायस्कूल कुदनुर येथे आयोजित  विविध कामांचे पूजन व मान्यवरांच्या सत्कार कार्यक्रमात डॉ. वैभव पाटील (तेऊरवाडी) प्रमुख पाहूणे व सत्कार मूर्ती म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य आर. डी.  कुंभार होते.

       डॉ. वैभव पाटील  पुढे बोलताना म्हणाले, आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर जिद्द् धैर्य व सातत्य अत्यंत महत्त्वाचे आहे. आपली परिस्थिती कशीही असली तरी ती यशाच्या आडवे येत नाही. आयुष्यात  कितीही मोठे झाला तरी शाळा व गुरुजनाना  विसरू नका. अपयशाला घाबरू नका, मनात कोणताही न्यूनगंड न ठेवता प्रयत्न करत राहिल्यास जग सुद्धा जिंकता येते असे सांगून परदेशात शिक्षणाची प्रचंड संधी असून यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहन डॉ. पाटील यांनी केले.

       यावेळी  प्रकाश कसलकर, नामदेव कोकितकर-उपसरपंच, शशिकांत सुतार-सामाजिक कार्यकर्ते, सिद्राम गुंडकल, नामदेव हेब्बाळकर, शिवाजी आंबेवाडकर, अशोक नागरदळेकर (निवृत्त प्राचार्य - वसंत देसाई विद्यालय आसुर्डे), पी. बी. पाटील (माजी प्राचार्य) यांच्या हस्ते वृक्ष पूजन करण्यात आले. यानंतर हायस्कूलचा माजी विद्यार्थी डॉ. वैभव पाटील यांचा आयर्लन्ड मध्ये पीएडी पदवी मिळवल्याबद्दल, प्राचार्य अशोक नागरदळेकर व सिद्राम गुंडकल यांचा निवृत्त झाल्याबद्दल प्राचार्य कुंभार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

       माजी प्राचार्य पी. बी. पाटील, प्राचार्य श्री नागरदळेकर यांनी आपल्या बालपणातील अनुभव कथन करून शाळेसाठी देणगी जाहिर केली. प्रारंभी शालेय जिण्याचे व  चौकटीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षिय मनोगत प्राचार्य आर. डी. कुंभार यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामस्थ, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक एन. पी. निर्मळकर यांनी केले. सुत्रसंचालन बी. एम. गणाचारी यांनी तर आभार आर. व्ही. देसाई यांनी मानले.



No comments:

Post a Comment