चिखलात दुचाकी स्वरांचे 'घालीन लोटांगण', कालकुंद्री नजीक रस्त्याची दुरावस्था - चंदगड लाईव्ह न्युज

07 September 2021

चिखलात दुचाकी स्वरांचे 'घालीन लोटांगण', कालकुंद्री नजीक रस्त्याची दुरावस्था

कालकुंद्री नजिक मोरीच्या दुतर्फा रस्त्याची झालेली दुरावस्था.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

            कालकुंद्री (ता. चंदगड) गावाजवळ कागणी मार्गावरील मोरीलगत झालेल्या चिखलात आज दि. ७ रोजी पंधरा ते वीस दुचाकीस्वारांची घसरगुंडी झाली. मोरीच्या दोन्ही बाजूस पडलेल्या मोठ्या खड्ड्यांत बांधकाम विभागाच्या अतिहुशार मंडळींनी दोन दिवसापूर्वी लाल माती टाकली आहे. रिमझिम पावसात येथील महात्मा फुले दूध संस्थेसमोर घसरगुंडी निर्माण झाली असून उतारावरून येणारे छोटे वाहन चालक घसरून पडत आहेत. याबाबत ग्रामस्थ व वाहनधारकांत संताप व्यक्त होत आहे.
             दोन वर्षापूर्वी या मोरीवर कॉंक्रिटचा पूल बांधण्यात आला आहे तथापि दोन्ही बाजूकडील रस्ता योग्य पद्धतीने करण्यात आलेला नाही. त्यामुळे मोरीच्या दोन्ही बाजूकडील रस्त्यावर मोठाले खड्डे पडले आहेत. गेली दोन वर्षे या खड्ड्यातूनच वाहनधारक मार्ग काढत आहेत. येथे दोन दिवसापूर्वी टाकलेल्या लाल मातीने रिमझिम पावसात धोकादायक रूप धारण केले आहे. चार दिवसात या ठिकाणी मजबूत खडीकरण व पावसाळ्या नंतर डांबरीकरण करावे. तोपर्यंत या ठिकाणी अपघात वा दुर्घटना घडून नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित बांधकाम विभागाने स्वीकारावी. अन्यथा ऐन गणेश चतुर्थीत ग्रामस्थांसह आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते एम जे पाटील तसेच शिवाजी कोकितकर यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment