चिंचणेच्या जेष्ठ नागरिकांचा चंदगड पंचायत समितीसमोर आमरण उपोषणाचा इशारा - चंदगड लाईव्ह न्युज

07 September 2021

चिंचणेच्या जेष्ठ नागरिकांचा चंदगड पंचायत समितीसमोर आमरण उपोषणाचा इशारा



तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

      चिंचणे (ता. चंदगड) येथील ग्रामपंचायतीमध्ये तत्कालिन ग्रामसेविकेने ग्रामस्थांच्या बोगस सह्या करून  विविध ठराव केले आहेत .  शासनाच्या निधिचा गैर वापर केलेला आहे. तसेच मागासवर्गीय १५% निधी बोगस पावत्या जोडून हडप करून मागासवर्गीय समाजावर अन्याय केलेला आहे. या विरोधात २० सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी १२ वाजता चंदगड पंचायत समिती समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. 

          निवेदनात पुढे म्हटले आहे की,  मराठी विद्या मंदिर चिंचणे क्रीडांगण सपाटीकरणाच्या नावाखाली बेकायदेशीर वाळू उत्खनन केले आहे; त्यामुळे शाळेच्या इमारतीच्या भिंतीना तडा जाऊन धोका निर्माण झालेला आहे. असे अनेक बेकायदेशीर कामे ग्रामपंचायतीने केलेली आहेत. याबाबत माहितीच्या अधिकाराखाली माहिती मिळवून सन २०१९ पासून ते आजपर्यंत अनेक निवेदने, अर्ज गटविकास अधिकारी पंचायत समिती, चंदगड यांना दिलेली आहेत. यापूर्वी पंचायत समिती समोर धरणे आंदोलन,निदर्शने व आत्मदहनाचा प्रयत्न चिंचणे ग्रामस्थांनी केलेला असून याबाबत गेली ३ वर्षे पाठपुरावा करून सुद्धा याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष करून जेष्ठ नागरिकांवर अन्याय केला जात आहे. या प्रकरणी चौकशी करून संबधितांवर कारवाई करावी ही मागणी चिंचणे ग्रामस्थांची आहे. याबाबत गटविकास अधिकारी चंदगड यांना अर्जाद्वारे चिंचणे ग्रामस्थांनी आमरण उपोषणाचा ईशारा दिलेला असून माहितीसाठी प्रत तहसिलदार व पोलिस निरीक्षक चंदगड, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पालक मंत्री व ग्रामविकास मंत्री यांना पाठविले आहे. हे आमरण उपोषण चंदगड पंचायत समिती समोर २० सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी १२ वा. पासून करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते पी.आर.देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. या अर्जावर पी.आर.देशमुख, दत्तू कांबळे, तुकाराम चिंचणेकर व गोपाळ पाटील यांच्या सह्या आहेत.

No comments:

Post a Comment