चंदगडचा निसर्ग व लोकांचे प्रेम आयुष्यभर विसरणार नाही - कृषी अधिकारी जाधव - चंदगड लाईव्ह न्युज

04 September 2021

चंदगडचा निसर्ग व लोकांचे प्रेम आयुष्यभर विसरणार नाही - कृषी अधिकारी जाधव

पंचायत समितीचे कृषी अधिकारी संतोष जाधव यांचा बदलीनिमित्त सपत्नीक सत्कार करताना सभापती ॲड. कांबळे, उपसभापती सौ. शिवनगेकर, गटविकास अधिकारी श्री. बोडरे व पं. स. सदस्य.

चंदगड / नंदकुमार ढेरे 

          पंचायत समिती स्तरावर काम करताना अनेक प्रसंगांना तोंड द्यावे लागले,पण पंचायत समितीचे दहा वर्षात लाभलेले सभापती, उपसभापती व सदस्य  यांनी कधीही आपले अधिकार गाजवले नाहीत त्यामुळे येथे काम करताना उत्साह वाढला. चंदगड तालुक्यातील वाडी वस्तीवर काम  करण्याची संधी मिळाली. येथील निसर्ग सौंदर्य आणि येथील लोकांचे मिळालेले प्रेम हे आयुष्यभर विसरणार नाही.तालुक्यातील जनतेने खुप प्रेम दिलं हे आयुष्यभर प्रेमाची शिदोरी म्हणून स्मरणात राहील असे भावनिक मत चंदगड पंचायत समितीचे कृषी अधिकारी संतोष जाधव यांनी व्यक्त केले. ते चंदगड पंचायत समितीच्या  वतीने बदली निमित्त आयोजित सत्कारा  प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी  सभापती ॲड.अनंत कांबळे होते.यावेळी जाधव यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

         यावेळी गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांनी जाधव यांनी केवळ आपल्या कामपुरते मर्यादित न राहता चंदगड तालुक्यातील गावकामगार ते उच्च पदस्थ लोकप्रतिनिधी यांच्यापर्यंत कामाच्या माध्यमातून त्यांनी लोकांशी जोडलेली नाळ याविषयी माहिती दिली. 

         तर सभापती ॲड. कांबळे म्हणाले कामपूरते काम न करता  जाधव यांनी तालुक्यात आपल्या कामातून वेगळ्या पद्धतीने गोतावळा निर्माण केला असे सांगितले. माजी सभापती शांताराम पाटील म्हणाले  तालुक्यात  एक शासकीय अधिकारी कसा असावा,मिळालेल्या संधीतून  जनतेची सेवा कशी करावी याचं उदाहरण म्हणजे  जाधव यांच्याकडे पहावे असे गौरवोद्गार काढले.

       यावेळी सदस्य दयानंद काणेकर,बबनराव देसाई ,संजय चंदगडकर  यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी उपसभापती मनीषा शिवणगेकर ,विठाबाई मुरकुटे, रूपा खांडेकर, नंदिनी पाटील यासह खातेप्रमुख उपस्थित होते. आभार एम. टी. कांबळे यांनी मानले.

No comments:

Post a Comment