शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सृजनशिलतेला संधी दिल्यास वैज्ञानिक निर्माण होतील - जेष्ठ वैज्ञानिक डॉ. रणवरे - चंदगड लाईव्ह न्युज

05 October 2021

शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सृजनशिलतेला संधी दिल्यास वैज्ञानिक निर्माण होतील - जेष्ठ वैज्ञानिक डॉ. रणवरे

जेष्ठ वैज्ञानिक डॉ. रणवरे, निवृत्त कमिशनर दत्ताजीराव देसाई सोबत शिक्षक वर्ग
.

तेऊरवाडी / सी .एल. वृत्तसेवा

        गुणवत्ता  शहरातच असते असे नाही  तर ग्रामिण भागासुद्धा उच्च प्रतिची गुणवत्ता आहे . शाळामधून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला व सृजनशिलतेला संधी दिल्यास मोठ्या प्रमाणात वैज्ञानिक निर्माण होतील  असे विचार जेष्ठ वैज्ञानिक डॉ.  एच. डी. रणवरे यानी व्यक्त केले.

          श्री शिवशक्ती हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज अडकूर (ता. चंदगड) येथे डॉ. भाभा संशोधन केंद्राचे जेष्ठ वैज्ञानिक डॉ. रणवरे यांनी  सदिच्छा भेट दिली. यावेळी डॉ. रणवरे बोलत होते. या कार्यक्रमाला मुंबईचे निवृत्त कमिशनर दत्ताजीराव देसाई उपस्थित होते.

           यावेळी पुढे बोलताना डॉ. रणवरे म्हणाले, पोखरण वावंटात अणू चाचणी घेताना अनेक अडचणीना सामोरे जावे लागले होते. तरी पण डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली हि अणूचाचणी 'आणि बुद्ध हसला, या सांकेतिक नावाखाली यशस्वी करून संपूर्ण जगाला भारताची ताकद दाखवून दिली. माझा जन्मही शेतकऱ्याच्या घरात झाला असला तरी गुणवत्तेच्या जोरावर यशस्वी झालो. अनेक पंतप्रधान व  संशोधकासोबत काम करण्याची संधी मिळाली. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांच्या अंतरंगामध्ये डोकावून सृजनशिलतेला वाव दिल्यास संशोधक निर्माण होतील. हेच संशोधक राष्ट्राची खरी संप्पत्ती आहे.

         निवृत्त कमिशनर दत्ताजीराव देसाई बोलताना म्हणाले, एक शिक्षक ते कमिशनर पर्यंततच्या प्रवासात अनेक पदावर काम न करताना वेगवेगळे अनुभव आले. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही. प्रामाणिकपणे काम करून देशाच्या प्रगतीला हातभार लावणारे गुणवान विद्यार्थी शिक्षकांनी घडवण्याचे आवाहन त्यानी केले.

          यावेळी प्राचार्य व्ही .एन. सुर्यवंशी यानी स्वागत केले. कार्यक्रमास  उत्तम पाटील, बंकट दिशेबकर, एस. एन. पाडले, आर. डी. पाटील, आय. वाय. गावडे, एस. डी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक एस. एन. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन पी. के. पाटील यांनी केले. आभार जे. व्ही. कांबळे यानी मानले.

No comments:

Post a Comment