दूध उत्पादन हाच शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय! तो अभ्यासपूर्ण करा - सदाशिव मोरे - चंदगड लाईव्ह न्युज

10 October 2021

दूध उत्पादन हाच शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय! तो अभ्यासपूर्ण करा - सदाशिव मोरे

कालकुंद्री येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन 

मार्गदर्शन शिबिराचे दीप प्रज्वलन करताना सदाशिव मोरे. 


कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

              शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाकडे शेतीला जोड दुय्यम धंदा म्हणून न पाहता मुख्य व्यवसाय म्हणून पहावे.  आज शेतीपेक्षा दुग्धोत्पादन हाच अधिक पैसा मिळवून देत आहे. असे प्रतिपादन  पशुधन व दुग्धोत्पादन अभ्यासक सदाशिव डी. मोरे यांनी केले. ते कालकुंद्री (ता. चंदगड) येथे ग्रामपंचायत व दूध संस्थांच्या वतीने आयोजित शेतकरी मार्गदर्शन शिबिरात बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच छाया जोशी होत्या.

 वयोवृद्ध शेतकर्‍यांचा सत्कार करताना मान्यवर.
    स्वागत पशुवैद्यकीय अधिकारी व्ही. के. परीट व जनहित संघटना तालुकाध्यक्ष शंकर कोले यांनी केले. प्रास्ताविक निवृत्त कृषी अधिकारी मनोहर पाटील यांनी केले. यावेळी मोरे यांनी दूध उत्पादन वाढीसाठी जातिवंत व निरोगी जनावरे खरेदी करा. माजावरील गाय, म्हशीला दर्जेदार लस देऊन जातिवंत वासरांची पैदास करुन वंशावळ सुधारा. मुक्त गोठा पद्धत अवलंबा. दिवसातून दोन वेळा पोटभर चारा व चांगले पशुखाद्य द्या; पण पिण्यासाठी २४ तास स्वच्छ व ताज्या पाण्याची व्यवस्था करा. एका गाय, म्हैशीला दिवसभरात ३० किलो चारा व खाद्य पुरेसे होते. यासोबत रोज ५० ग्रॅम मीठ द्यावे. गाभण व व्यालेल्या तारखा, चारा, खाद्य, दुध फॅट यांच्या नोंदी ठेवण्याची सवय लावून घ्या. शेतात चांगल्या चाऱ्याची निर्मिती करा, दूध उत्पादक शेतकऱ्यांचे गट तयार करून अभ्यास सहलींचे आयोजन करुन चांगल्या गोठ्यांना भेटी द्या. तोट्याचा धंदा करू नका. यासह दूध काढण्याच्या योग्य पद्धती, स्वच्छता, निगा, औषधोपचार आदीबाबत विस्तृत मार्गदर्शन करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे निरसन केले. 

         यावेळी गडहिंग्लज तालुका शिव सहकार सेना अध्यक्ष अखलाक मुजावर, कृष्णराव वाईंगडे, विकास मोरे यांची भाषणे झाली. यानिमित्त गावातील नव्वदी पूर्ण केलेल्या तुकाराम ज्ञानोबा पाटील, बाबू लक्ष्मण पाटील- केळगावडे, कृष्णा कामाना पाटील, गणपती सतबा पाटील, गोपाळ सट्टूपा पाटील या ५ वयोवृद्ध शेतकऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गावातील श्रीकृष्ण, काशिर्लिंग, कलमेश्वर, आनंदराव पाटील, लक्ष्मी, स्वामी समर्थ, शिव शंकर आदी दूध संस्थांचे पदाधिकारी, सभासद, उपसरपंच संभाजी पाटील, प्रा. डॉ. व्ही. आर. पाटील, राजू रेडेकर, शंकर सांबरेकर, भरत पाटील, सुरेश नाईक यांचेसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के. जे. पाटील यांनी केले. श्रीकांत  पाटील यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment