अतिक्रमण करून बांधलेले दुकानगाळे काढणार! कुदनूर ग्रामसभेतील ठरावामुळे खळबळ - चंदगड लाईव्ह न्युज

19 October 2021

अतिक्रमण करून बांधलेले दुकानगाळे काढणार! कुदनूर ग्रामसभेतील ठरावामुळे खळबळ

 


कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
     कुदनुर (ता. चंदगड)  येथे अतिक्रमण करून बांधलेले दुकानगाळे काढून जागा खुली करण्याचा निश्चय येथील ग्रामपंचायतीने केला आहे. काल दि १८ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या ग्रामसभेत ही घोषणा करण्यात आली. अध्यक्षस्थानी उपसरपंच नामदेव कोकितकर होते.
  ग्राम विकास अधिकारी श्रीकांत सोनार यांनी स्वागत करून विषय पत्रिकेवरील मुद्द्यांचे वाचन केले. यात गावातील पानंद व इतर  रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून ती खुले करणे या विषयावर गट नंबर १०६९ मधील बहुचर्चित दुकान गाळ्यां संदर्भात जोरदार चर्चा झाली. अतिक्रमण करून बांधण्यात आलेले हे गाळे काढून टाकण्याचा ठराव करण्यात आला. याबाबत संबंधितांना २६ ऑक्टोबर पर्यंत अतिक्रमणे काढून घेण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या असून स्वतःहून जागा रिकामी न केल्यास २६ तारीख नंतर कोणत्याही क्षणी ग्रामपंचायत मार्फत अतिक्रमणे काढून टाकण्यात येणार आहे. या संभाव्य कार्यवाहीमुळे गाळेधारकांत खळबळ उडाली आहे. याशिवाय पंधराव्या वित्त आयोगातील आराखड्यांना मंजुरी घेणे, आर्थिक जमाखर्चांना मंजुरी घेणे, रोजगार हमी योजना मजूर बजेट तयार करणे, १४ वा वित्त आयोग शिल्लक निधी तात्काळ खर्च करणे, घरपट्टी, करवसुली १००% पूर्ण करणे, सुरू असलेली विकास कामे आदी विषयांवर चर्चा झाली. आमदार राजेश पाटील यांनी विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, पोलीस पाटील, कृषी सहाय्यक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपं. सदस्य तुकाराम ओऊळकर यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment