महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षेच्या तारखेमध्ये तिसऱ्यांदा बदल, वाचा कधी होणार परिक्षा? - चंदगड लाईव्ह न्युज

22 October 2021

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षेच्या तारखेमध्ये तिसऱ्यांदा बदल, वाचा कधी होणार परिक्षा?


संपत पाटील / चंदगड – सी. एल. वृत्तसेवा

बहुचर्चित शिक्षक पात्रता परिक्षेबाबत उमेदवारांना कमालीची उत्सुकता आहे. या उमेदवारांना परिक्षेच्या तारखेबाबत `तारीख पे तारीख` मिळत असल्याने उमेदवारांच्यातून नाराजीचा सुर आहे. शिक्षक पात्रता परिक्षा आता २१ नोव्हेंबर २०२१ रोजी घेण्यात येणार असल्याची परिक्षा दिनांक बदलाबाबतचे प्रसिध्दीपत्रक https://mahatet.in/ या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. 

महाटीईटी संकेतस्थळावर मिळालेल्या माहीतीनुसार २१ नोव्हेंबरला होणाऱ्या परिक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्राची प्रिंट २६ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत मिळेल. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक १ हा २१ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १ तर शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक २ हा त्याच दिवशी दुपारी २ ते ४.३० या कालावधीत होईल. 

सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढल्याने अनेकजण नोकरीच्या शोधात आहेत. हुशारी असूनही हुशारी दाखविण्याची संधी मिळत नसल्याने अनेकजण संधीची वाट पहात होते. कोरोनाच्या महामारीमुळे अनेकांनी आपली नोकरी गमावली आहे. त्यामुळे घरखर्च चालविताना अनेकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रत्येकाची जगण्यासाठी धडपड सुरु आहे. कोरोनाचा प्रभाव काहीसा कमी होत असताना शिक्षक पात्रता परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी जाहिरात निघाल्याने अनेकांनी या परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज केले. मिळालेल्या माहीतीनुसार अभ्यासही सुरु केला. मात्र शिक्षक पात्रता परिक्षेच्या तारखाबाबत `तारीख पे तारीख` मिळत असल्याने उमदेवारांच्यामध्ये नाराजीचा सुरु आहे. काहींनी तर या परिक्षेच्या अभ्यासासाठी सुट्टी देखील घेतल्याचे समजते. त्याचे काहीसे नुकसान होणार आहे. 

काही उमेदवारांच्यासाठी परिक्षा तारखेतील बदल झाल्यामुळे अभ्यासासाठी अधिक वेळ मिळल्याची भावना आहे. तर ज्या उमेदवारांनी जोरदार तयारी केली होती. त्यांच्यासाठी अडचण होताना दिसत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने २१ नोव्हेंबर २०२१ रोजी परिक्षा घेवून उमेदवारांना दिलासा देण्याची गरज आहे. 


      तारखेमध्ये तीन वेळा बदल 

१) शिक्षक पात्रता परिक्षा हि १० ऑक्टोबर २०२१ रोजी होणार होती. मात्र केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत लेखी परिक्षेचे आयोजन केले होते. त्यामुळे एकाच दिनांकास परिक्षा आल्याने उमेदवारांचे नुकसान होऊ नये. हि बाब विचारात घेवून परिक्षा १० ऑक्टोबर २०२१ एवजी ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी ठेवण्यात आली होती. 

२) ३१ ऑक्टोबर २०२१ ला आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाकडील विविध पदांच्या भरतीसाठी लेखी परिक्षा असल्याने हि बाब विचारात घेवून मंत्री शालेय शिक्षण व क्रिडा विभागाने शिक्षक पात्रता परिक्षा हि एक दिवस अगोदर म्हणजे ३० ऑक्टोबर २०२१ रोजी घेण्याचे महाटीईटी संकेतस्थळावर दर्शविले होते. 

३) ३० ऑक्टोबर २०२१ रोजी होणाऱ्या टीईटीच्या परिक्षा दिनांकास देगलुर-बिलोली विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुक आहे. हि बाब विचारात घेवून सदर शिक्षक पात्रता परिक्षा हि २१ नोव्हेंबर २०२१ रोजी घेण्याचे संकेतस्थळावर जाहीर केले आहे. 

No comments:

Post a Comment