....आणि उद्बोधन वर्गाचा नूर पालटला.... पोलीस निरीक्षक तळेकर यांनी हाताळला साप! - चंदगड लाईव्ह न्युज

08 October 2021

....आणि उद्बोधन वर्गाचा नूर पालटला.... पोलीस निरीक्षक तळेकर यांनी हाताळला साप!

ढोलगरवाडी येथे साप हाताळताना पोलीस निरीक्षक बी ए तळेकर सोबत सर्पमित्र सदाशिव पाटील व अन्य.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

        सर्प शाळेविषयी प्रसिद्ध असलेल्या ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथील सातेरीदेवी मंदिरात पंचक्रोशीतील सरपंच तंटामुक्त कमिटी अध्यक्ष, पोलीस पाटील, महिला बचत गट, युवक मंडळे यांच्यासाठी 'विधी साक्षरता अभियान' उद्बोधन वर्ग आयोजित करण्यात आला होता. ढोलगरवाडीच्या सरपंच सरिता तुपारे यांच्या अध्यक्षतेखालील कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून चंदगडचे पोलीस निरीक्षक बी. ए. तळेकर उपस्थित होते. 

          तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष सर्पमित्र प्रा. सदाशिव पाटील हे प्रास्ताविक करत असताना त्यांच्या मोबाईलवर "गावातील परशराम पाटील यांच्या घरात साप घुसला असून सर्व स्त्रिया, मुले भयभीत झाली आहेत लवकर या!" असा फोन येताच उद्बोधन वर्गाचा नूरच पालटला! सदाशिव पाटील यांनी आपत्कालीन परिस्थिती ओळखून हातातील माईक तिथेच ठेवत घटनास्थळी धाव घेतली. पो नि.तळेकर यांनीही तशी विनंती केली. काही वेळात पाटील साडेसहा फूट लांबीच्या बिनविषारी धामण सापासह परतले. मुख्य कार्यक्रम संपल्यानंतर तळेकर यांच्या विनंतीवरून सदाशिव पाटील यांनी सापांचे पर्यावरणातील महत्त्व, अंधश्रद्धा, घ्यावयाची दक्षता याबाबत मार्गदर्शन केले. यानंतर पोलीस निरीक्षक तळेकर यांनी प्रथमच साप हाताळला. उपस्थितांना सर्प आपला मित्र आहे. त्याचे संवर्धन झाले पाहिजे. असे आवाहन केले. यावेळी काही महिलांनीही धाडस दाखवत साप हाताळला. यानंतर सर्व मान्यवरांनी सर्प शाळेस भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली. आजवर विविध खात्यातील हजारो अधिकाऱ्यांनी सर्पशाळेस भेट दिली. तथापि आपल्या चाळीस वर्षांच्या पाहण्यात साप हाताळणारे तळेकर हे पहिलेच अधिकारी असल्याचे सदाशिव पाटील यांनी सांगितले. यावेळी उपसरपंच बाबुराव तुपारे, प्रा. दीपक पाटील, नाना डसके, प्रकाश भोगुलकर, पोलीस पाटील राजू पाटील, पोहेकॉ. कसेकर आदींसह ढोलगरवाडी, कडलगे खुर्द कडलगे बुद्रुक, मांडेदुर्ग, सुंडी, करेकुंडी आदी गावातील पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment