हलकर्णी येथील दौलत संचलित अथर्व साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदिपन कार्यक्रम शुक्रवारी - चंदगड लाईव्ह न्युज

06 October 2021

हलकर्णी येथील दौलत संचलित अथर्व साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदिपन कार्यक्रम शुक्रवारी


चेअरमन मानसिंग खोराटे

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत संचलित अथर्व इंटरट्रेड प्रा.लि. लिज्ड युनिट दौलत शेतकरी सहकारी साखरा कारखान्याचा सन २०२१-२२ या गळीत हंगामासाठीचा "बॉयलर अग्निप्रदिपन" कार्यक्रम शुक्रवार दि ८ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी साडेनऊ वाजता आयोजित केला आहे. 

दौलत संचलित अथर्व साखर कारखाना 

         दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना अथर्व इंटरट्रेड प्रा. लि. या कंपनीकडून दीर्घ कालावधीकरीता भाडे तत्वाने चालवला जात असून, चालू गळीत हंगामासाठी ६ लाख मे. टन ऊस गळीताचे उद्दीष्ठ ठेवण्यात आले आहे. कारखाना यंत्र सामुग्री दुरुस्तीची कामे बहुतांशी पुर्ण झालेली असून, कारखान्यासाठी योग्य पध्दतीने ऊस पुरवठा होण्यासाठी आवश्यक ती ऊस तोडणी यंत्रणा भरण्यात आलेली आहे. साखर निर्मिती बरोबर उपपदार्थ निर्मीतीचे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून कारखान्याच्या डिस्टीलरी प्रकल्पाचे आधुनिकरण पुर्ण होत असून, या प्रकल्पामधून इथेनॉल उत्पादन चालु गळीत हंगामापासून सुरु होणार आहे. इथेनॉल निर्मितीमुळे कारखान्याला आर्थिक पाठबळ मिळेल असे कंपनीचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी सांगितले. ऊस उत्पादक शेतकरी हा कारखान्याचा महत्वाचा कणा असल्याने हा कार्यक्रम कार्यक्षेत्रातील प्रगतशील ऊस उत्पादक शेतकरी यांच्या हस्ते आयोजीत करण्यात आलेले आहे. कार्यक्रमासाठी ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, कर्मचारी व तालुक्यातील प्रतिष्ठीत व्यक्ती यांनी उपस्थित राहावे असे ही आवाहन कंपनीचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी केले.

No comments:

Post a Comment