निवडणुकांपूर्वी मतदार यादीत नाव नोंदणीसाठी शेवटची संधी! - प्रांताधिकारी वाघमोडे - चंदगड लाईव्ह न्युज

09 October 2021

निवडणुकांपूर्वी मतदार यादीत नाव नोंदणीसाठी शेवटची संधी! - प्रांताधिकारी वाघमोडे

चंदगड येथे बीएलओ, पर्यवेक्षकांना मार्गदर्शन करताना प्रांताधिकारी वाघमोडे सोबत तहसीलदार रणवरे, नायब तहसीलदार कामत.

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

           १ जानेवारी २०२२ हा अर्हता दिनांक धरून सुरू असलेला 'मतदार यादी विशेष पुनरिक्षण कार्यक्रम'  निवडणुकांपूर्वी मतदार यादीत नाव नोंदणी व दुरुस्तीसाठी शेवटची संधी असेल. यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत अशा विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू होणार आहेत. याचा नागरिकांनी जाणीवपूर्वक लाभ घ्यावा. असे आवाहन गडहिंग्लज उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी केले. ते चंदगड येथे बीएलओ, पर्यवेक्षक प्रशिक्षण प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

प्रशिक्षण प्रसंगी उपस्थित बीएलओ

         स्वागत तहसीलदार विनोद रणवरे यांनी केले. नायब तहसीलदार हेमंत कामत यांनी प्रास्ताविक केले. यावेळी पुढे बोलताना प्रांताधिकारी वाघमोडे म्हणाले 'निवडणूक जितकी लहान तीतकी चुरस जास्त' त्यामुळे मतदार यादीत त्रुटी राहणार नाही यासाठी सतर्क रहावे. मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांनी 'वोटर हेल्पलाइन ॲप' सुरू केले आहे. याचा उपयोग बीएलओ व मतदारांनी करून घ्यावा. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजकीय पक्ष व कार्यकर्त्यांनी जनजागृती करावी. जिवंत मतदार मयत म्हणून डिलीट होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे सांगतले. यावेळी तहसीलदार रणवरे यांनी प्रशासकीय सूचना केल्या. 'वोटर हेल्पलाइन' व 'गरुडा ॲप' वापर बाबत निवडणूक विभागाचे निहाल मुल्ला यांनी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. यावेळी तालुक्यातील १९८ बीएलओ व २० पर्यवेक्षक उपस्थित होते.

बीएलओ, पर्यवेक्षकांकडून मानधनाची मागणी

           बीएलओ, पर्यवेक्षकांना वार्षिक ५ हजार रुपये मानधन देण्याची घोषणा निवडणूक विभागाने केली असली तरी गेल्या दोन-तीन  वर्षांत मानधन न मिळाल्याने असंतोष आहे. निवडणुकांच्या काळात महिन्यातून चार वेळा व इतर वेळी महिन्यातून किमान एकदा मिटींगला जावे लागते. तालुक्याच्या मोठ्या विस्तारामुळे बहुतांशी भागातील कर्मचाऱ्यांना तालुक्याला जा- ये साठी ५० ते १०० किमीचा प्रवास करावा लागतो. झेरॉक्स, मोबाईल, डाटा रिचार्जवर बरेच पैसे खर्च होतात. त्यामुळे मानधन तत्काळ मिळावे . या मागणीवर आपली मागणी जिल्हाधिकारी यांचेकडे पोहोचवली जाईल व निवडणूक आयोगाकडून  मानधनाचा निधी येताच आपल्या बँक खात्यावर वर्ग करू. असे आश्वासन  प्रांताधिकारी वाघमोडे यांनी दिले.

शिक्षकांची नेमणूक का?

           "मतदार यादी कामांसह जनगणना व निवडणूक प्रक्रियेसारख्या राष्ट्रीय कार्यात प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची भूमिका अनन्यसाधारण आहे. निवडणुकीत मतदान काळात विविध विचारांचे, प्रवृत्तीचे मतदार, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते येतात. बऱ्याच वेळा वादाचे व विचित्र प्रसंग निर्माण होतात. यावेळी शिक्षकच चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळू शकतात. याची निवडणूक विभागाला खात्री असल्यामुळे  प्रत्येक बुथवर किमान एक तरी शिक्षक मतदान अधिकारी म्हणून असेल यासाठी निवडणूक विभाग जाणिवपूर्वक पाहते!" अशा पद्धतीने वाघमोडे यांनी शिक्षकांचे निवडणूकीतील महत्त्व विशद केले. याला उपस्थित शिक्षकांनी टाळ्या वाजवून दाद दिली.

No comments:

Post a Comment