बालचमुंचा किल्ले बांधणी उत्साह शिगेला! तहानभूक ही हरपली - चंदगड लाईव्ह न्युज

01 November 2021

बालचमुंचा किल्ले बांधणी उत्साह शिगेला! तहानभूक ही हरपली

कोवाड येथील केंद्रीय शाळा आवारात बालचमू मार्फत सुरु असलेली मल्हारगडाची प्रतिकृती.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

        दिवाळीच्या सुट्टीत बालचमूंचा किल्ले बांधणीतील उत्साह शिगेला पोहोचला आहे. गावोगावी आणि गल्लोगल्ली तहानभूक हरपलेले बालमित्र छत्रपती शिवरायांचा देदीप्यमान इतिहास हुबेहूब साकारण्यात दंग झाले आहेत.


कालकुंद्री येथे बाल मंडळामार्फत साकारत असलेला सातारा नजीकच्या अजिंक्यतारा किल्ला.

      काही वर्षापूर्वी केवळ शहरी भागापुरती मर्यादित असलेली दीपावलीतील किल्ले बांधणी आता ग्रामीण भागांतही चांगलीच रुजल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी आदिलशहा, निजामशहा, कुतुबशहा, मुघल, इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच व स्वकीय शत्रूंशी सामना देत रयतेचे स्वराज्य निर्माण केले. या स्वराज्याचे खरे राखणदार ठरले छत्रपतींनी बांधलेले साडेतीनशे गडकोट किल्ले. या गिरिदुर्ग, जलदुर्ग व भुईकोट किल्ल्यांचा इतिहास सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य दीपावली काळात प्रतिकृतींच्या माध्यमातून बालचमूंमार्फत केले जाते. सध्या याला जोड मिळाली आहे ती विविध संघटनांच्या वतीने ठेवण्यात आलेल्या किल्ला स्पर्धांची. स्पर्धांची बक्षिसे पटकावण्याच्या निमित्ताने बालकांच्या ज्ञानात संबंधित किल्ले व त्यांच्याशी संबंधित ऐतिहासिक घटना यांच्या इत्यंभूत माहितीची भर पडते. 

         यादरम्यान कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षण व मोबाईलच्या जंजाळातून काही काळ बालकांना मुक्ती मिळाली आहे. चंदगड तालुक्यात विविध मंडळांनी ठेवलेल्या स्पर्धांचे परिक्षण जवळ येऊन ठेपल्याने किल्ला मंडळे शिवराय, मावळे, तोफा, रणगाडे, हत्ती, घोडे आदींच्या प्रतिकृती जमवण्यासह ऐतिहासिक पार्श्वभूमी निर्माण करण्यासाठी युद्धपातळीवर कामाला लागली आहेत.

No comments:

Post a Comment