चंदगड तालुक्याच्या कर्यात भागात वसुबारस निमित्त गोधनाची पूजा - चंदगड लाईव्ह न्युज

01 November 2021

चंदगड तालुक्याच्या कर्यात भागात वसुबारस निमित्त गोधनाची पूजा

कालकुंद्री येथे वसुबारस निमित्य गायीची पूजा करताना शेतकरी व मान्यवर.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

         दिवाळीच्या सुरुवातीला येणारा वसुबारस हा सण आश्विन महिन्यातल्या वद्य द्वादशी रोजी साजरा केला जातो. यास गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. चंदगड तालुक्याच्या पश्चिम व पूर्वेकडील कर्यात भागात आपला पूर्वज राजा बळीराजाने मान्यता दिलेल्या या सणानिमित्त गाय वासरू व गोधना ची पूजा करून त्यांच्या बद्दलची कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी त्यांना अंघोळ, अंगावर आकर्षक झूल घालून पौष्टिक व गोड-धोड खाण्यास दिले.

          बळीराजाच्या काळापासून परंपरागत या दिवशी घरातील गोधनाची पूजा केली जाते. समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते. अशी आख्यायिका आहे. या दिवशी अनेक जन्मांच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासहित गायीची पूजा केली जाते. ह्या दिवसापासून घरासमोर रांगोळी काढण्यास सुरुवात करतात. भरपूर कृषी उत्पादन मिळावे, आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात. या दिवशी संध्याकाळी घरातील तुळशीपुढे आणि दारात, परिसरात दिवाळी सणाच्या प्रारंभानिमित्त पणत्यांची रोषणाई करण्याची रूढी आहे.

        कालकुंद्री (ता. चंदगड) येथील काशिलिंग दूध संस्थेत झालेल्या कार्यक्रमात माजी जिप. सदस्या सुजाता पाटील यांच्या हस्ते गायीचे पूजन करण्यात आले. यावेळी शंकर संबरेकर, सौ सुधा सांबरेकर, एम जे पाटील, गोकुळ दूध संघाचे पर्यवेक्षक लक्ष्मण आडाव, चेअरमन अशोक पाटील, तंटामुक्त अध्यक्ष शंकर कोले, ईश्वर वर्पे, तानाजी पाटील, महेश पाटील, भरत पाटील, यल्लाप्पा पाटील, विठ्ठल कांबळे, पुंडलिक नाईक, शिवाजी नाईक, नागोजी पाटील आदींची उपस्थिती होती.


No comments:

Post a Comment