'मळणी' भूतकाळातील सुगीच्या दिवसांची जाणीव करून देणारी वास्तववादी कविता - चंदगड लाईव्ह न्युज

02 November 2021

'मळणी' भूतकाळातील सुगीच्या दिवसांची जाणीव करून देणारी वास्तववादी कविता

मळणीचा संग्रहित फोटो

कालकुंद्री: श्रीकांत पाटील/ सी. एल. वृत्तसेवा

         सध्या सर्वत्र भाताच्या सुगीचा हंगाम सुरू आहे. त्यातही चंदगड तालुका म्हणजे भाताचे कोठार! येथील बळीराजाची सुगीतील लगबग नजरेत भरणारी असते. अलीकडे उसाचे उत्पादन या परिसरात कमालीचे वाढले आहे. तरीही भात पिकाचा 'बाज' अद्यापि टिकून आहे. गेल्या तीसेक वर्षात कृषी क्षेत्रात अनेक स्थित्यंतरे घडली आहेत. यात प्रामुख्याने पारंपारिक अवजारे जाऊन यांत्रिकीकरण वाढले आहे. चंदगड तालुका व विशेषतः पूर्वेकडील कर्यात भागात दरवर्षी हजारो टन भात उत्पन्न निघायचे.

प्रा. डॉ. बी. जी. खाडे



        तीस वर्षांपूर्वी ट्रॅक्टर किंवा अन्य यांत्रिक साधने नसल्यामुळे पाच क्विंटल पासून पन्नास क्विंटल पर्यंतच्या भाताच्या मळण्या बैलांच्या सहाय्याने त्यांना तिवड्या भोवती फिरवून खळ्यावर काढल्या जायच्या. अशाच त्या काळातील भाताच्या मळण्यांचे वास्तववादी वर्णन प्रा. डॉ. बी जी खाडे, शासकीय अध्यापक महाविद्यालय, पनवेल (मुळगाव- कागणी, ता. चंदगड, जि, कोल्हापूर) यांनी आपल्या 'मळणी' या कवितेतून सादर केले आहे. पाच-सहा वर्षापूर्वी त्यांनी लिहिलेली ही कविता आपणास नक्कीच आवडेल.


                      मळणी....

मळणीतली मज्जा ती औरच असायची 

नात्यातली नाळ ती  हळूहळू जुळायची ।। धृ।।


कोणाचं खळं भेगाळलेलं असायचं 

शेजाऱ्याच्या पाण्यानं ओलावा धरायचं 

एकमेकांची मदत साऱ्यांनाच लागायची।। १।।


कोणाच्या मेटी तर कोणाची दावण                           

कोणाची गाडी तर कोणाची बैलं  

नाही! म्हणायची हिम्मत कोणातच नसायची ।। 


संध्याकाळी बैलांचे कासरे सुटायचे 

अंधारात मळणकरी पायवाट धरायचे 

खळ्यांवर वेळेत सारीचं जमायची।। ३।।


कोणी व्हळी उपसायचं कोणी दावण बांधायचं

 न सांगताचं पोरांनी पातीमागं धावायचं 

आपोआप कामं नियमांविना चालायची ।। ४।।

    

हळूहळू मळणकरी वळ्ळा काढू लागायचे

आकडीने वडिलधारे पिंजार हलके करायचे     

बघता बघता खळ्याभोवती भींत व्हायची ।।५।।


    कोणी आजोबा चहा तयार करायचे 

भडंग- चिरमुऱ्यांवर ताव सारे मारायचे

कधी कधी लवंगी मिरची हाय-हाय म्हणायची ।। ६।।


कोण गाणी म्हणायचं कोण विनोद करायचं

भुता-खेतांच्या गोष्टींनी शिवार स्तब्ध व्हायचं 

वळ्ळा रचत मुले कोलांट उड्या मारायची ।। ७।।


व्हळीवरचं माणूस ठरलेलं असायचं 

झाडणाऱ्यांनी झाडून कवळे मोठे करायचं 

कवळे उचलून मुले व्हळीवर पोचवायची।। ८।।


हळूहळू कोणी पात सोडू लागायचं 

बैलांसाठी कोणी भारे बांधत रहायचं 

पिंजरातल्या ऊबेने थंडी पळून जायची ।।९।।


घरी बाया-बापड्यांनी स्वयंपाकात गुंतायचं 

मामी, आत्या, मावश्यांनी गोडधोड करायचं

सणांच्या वासांनी घरं दरवळून जायची ।।१०।।


आग्रहाचं बोलावणं साऱ्यांनाच असायचं 

शर्थीने वाढलेलं जेवण भरपूर जेवायचं 

समाधानाचे ढेकर देत पंगत सारी उठायची ।।११।।


आता सार बदललं भात गेलं मळणी गेली

आपल्या माणसांतली जूळणीच हरवली

नात्यातली नाळ आता कुठे, कशी जोडायची? ।।१२।।


कवी -   प्रा. डॉ. बी. जी. खाडे (कागणी, ता. चंदगड/ पनवेल) मोबाईल नंबर 9833987546.

1 comment:

Post a Comment