प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्कम झाला पाहिजे - डॉ. राजेंद्र कोळी, पाटणे शाळेस ५१ हजारांची देणगी - चंदगड लाईव्ह न्युज

09 November 2021

प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्कम झाला पाहिजे - डॉ. राजेंद्र कोळी, पाटणे शाळेस ५१ हजारांची देणगी

पाटणे येथे सुशोभीकरण केलेल्या शाळा खोलीचे उद्घाटन करताना डॉ राजेंद्र कोळी, सभापती कांबळे गटशिक्षणाधिकारी सुभेदार आदी.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

         बालवयात झालेले संस्कार चिरकाल टिकतात. या काळात बालमनावर झालेल्या चांगल्या आचार, विचार, सवयी, संस्कारांच्या शिदोरीवर पुढे यशाची शिखरे गाठता येतात. असे सुसंस्कार पन्नास वर्षांपूर्वी पाटणे ता. चंदगड येथील जिप. मराठी शाळा व शिक्षकांनी माझ्यावर केले. असे भावपूर्ण प्रतिपादन पुणे येथील अनंतराव पवार कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे प्राचार्य डॉ. राजेंद्र कोळी (मुळगाव- बसर्गे ता. गडहिंग्लज) यांनी केले. ते विद्यामंदिर पाटणे  शाळेत देणगी प्रदान कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच गणपत दळवी होते. 

क्रीडा व शैक्षणिक साहित्य प्रदान प्रसंगी उपस्थित पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्या सोबत कोळी कुटुंबीय.

          स्वागत अध्यापक शमसुद्दीन मुल्ला यांनी केले. यावेळी पं.स. चंदगडचे सभापती ॲड. अनंत कांबळे व गटशिक्षणाधिकारी सौ. एस. एस. सुभेदार यांची प्रमुख उपस्थिती होती. आपल्याला घडवणाऱ्या शाळा व परिसराचे आपण काही देणे लागतो या भावनेतून या शाळेतील शिक्षणाच्या पन्नास वर्षपूर्ती निमित्य त्यांनी ५१ हजार रुपयांचे क्रीडा व शैक्षणिक साहित्य तसेच फर्निचर देणगी स्वरूपात दिले. राजेंद्र कोळी यांचे वडील भंगारी कोळी वनविभागातील सेवेमुळे पाटणेत दहा वर्षे सहकुटुंब वास्तव्यास असताना डॉ. कोळी यांनी सन १९७१ ते १९७३  पहिली, दुसरी चे शिक्षण येथे घेतले होते. त्यांचे बहुतांशी बालपण याच गावात गेले होते. यावेळी पुढे बोलताना आर्किटेक्चर महाविद्यालयाच्या माध्यमातून पाटणे गावची भौगोलिक परिस्थिती, भौतिक गरजा याबाबत परिपूर्ण विकास आराखडा तयार करून तो ग्राम विकास विभागाकडे सादर करण्याचा मनोदय व्यक्त केला. यावेळी बोलताना सभापती ॲड. कांबळे, गटशिक्षणाधिकारी सौ. सुभेदार यांनी डॉ. कोळी यांची मागे वळून पाहण्याची वृत्ती इतरांसाठी निश्चितच अनुकरणीय आहे. असे मनोगत व्यक्त केले. 

         कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा संजना बांदेकर व  ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालक, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते. सुत्रसंचालन भेबा कांबळे यांनी केले. मुख्याध्यापक  जोतिबा आप्पाजी पाटील यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment