हलकर्णी ग्रामपंचायतीच्या ७१ लाख थकीत कर वसूलीसाठी मळवीकरांनी जबाबदारी घ्यावी - सरपंच गावडे व सदस्य - चंदगड लाईव्ह न्युज

09 November 2021

हलकर्णी ग्रामपंचायतीच्या ७१ लाख थकीत कर वसूलीसाठी मळवीकरांनी जबाबदारी घ्यावी - सरपंच गावडे व सदस्य

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत सहकारी साखर  कारखाना सुरु करतेवेळी ग्रामपंचायतने सन २०१९-२० मध्ये ६, ४, ६२, २५८ थकीत रकमेपैकी २५ लाख थकीत ग्रामपंचायत कर भरणा केलेशिवाय कारखान सुरु करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देणार नसल्याचे सांगितले होते. तथापि ग्रामपंचायतीमध्ये वेळोवेळी बैठीका  घेऊन थकीत रक्कमेपैकी अथर्व इंटरट्रेड कंपनीने १० लाख रक्कम सुरवातीला देण्याचे कबुल करून उर्वरित थकीत रक्कम हप्त्याने देण्याचे कबुल केले होते. त्यानंतर कारखान्याला नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आले. दौलत कारखाना चालू होण्यासाठीच ग्रामपंचायत प्रशासनाने त्यांना सर्व ते  सहकार्य केले आहे. याची जाणीव कदाचित मळवीकर यांना नसावी असा आरोप हलकर्णी ग्रा. पं. चे सरपंच राहुल गावडे व सदस्यांनी प्रसिध्दी पत्रकातून केला. 

      सध्या हलकर्णी ग्रामपंचायतीचे करापोटी थकबाकीसह ७१ लाख रुपये येणे असून याबाबत कारखाना प्रशासन व के. डी. सी. सी. बँकेकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. पण दोघांकडूनही वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. याबाबत अथर्व कंपनी आपले हात वर करीत असून  सदर येणे वसुलीसाठी संतोष मळवीकर यांनी ग्रामपंचायत हलकर्णीच्या वतीने सुपारी घ्यावी असे हलकर्णी ग्रामपंचायतीचे सरपंच राहुल गावडे, उपसरपंच रमेश सुतार व ग्रामपंचायत सदस्य यांनी मागणी केली आहे.

       कारखान्याच्या धुर प्रदूषणातून येणाऱ्या राखेमुळे हलकर्णी ग्रामस्थांना त्रास होत असून हलकर्णी गावातील अनेक जणांना श्वसनाचे आजार निर्माण झाले आहेत. पिण्याचे पाणी दुषित होत आहे. तसेच लोकांच्या घरामध्ये राखेचा थर साचत आहे. याच बरोबर कारखान्याचे मळमिश्रित पाण्यामुळे लोकांची पिके करपत आहेत. पाणी नदी पात्रात मिसळल्याने पाणी प्रदूषित  होत आहे. गेल्या वर्षीच पाण्यामुळे नदीतील मासे मृत होवून त्याचा खच पडला होता. हे सर्वच तालुकावाशीयांना ज्ञात आहे. दुषित पाण्याचा परिणाम हलकर्णी, माणगाव, कोवाड पासून कामेवाडी, दड्डी पर्यंतच्या लोकांना भोगावे लागत आहेत. याबाबत अनेक वृत्त पत्रातून बातम्या प्रसिद्धीस आल्या होत्या .

       या संदर्भामध्ये हलकर्णी ग्रामपंचायतीच्या वतीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ कोल्हापूर (एमपीसीबी) यांच्याकडे या बाबतींत चौकशी करण्यासाठी मागणी केलेली आहे. ही मागणी मळवीकरांना कशी काय चुकीची वाटली? तुम्ही समाजामध्ये काम करत आहात. तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीचे प्रमुख म्हणून काम करत होता. त्यामुळे कोणाची तरी सुपारी घेऊन स्वतःची सवंग प्रसिद्धी बंद करावी व मळवीकरांनी कारखान्याच्या बाबतीमध्ये कोणत्या छुप्या शक्ती आडव्या येतात ते जाहीर करावे. आज पर्यंत कारखाना सुरु होण्यासाठी ग्रामपंचायतीने सहकार्यच केले आहे. ग्रामपंचायतीशी चर्चा करण्यासाठी कारखाना प्रशासनाला कोणतेही बंधन नाही, असे निवेदनात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment