ट्रामा केअर सेंटर चंदगड शहरामध्ये व्हावे - नगरसेवक दिलीप चंदगडकर यांचे आमदारांना पत्र - चंदगड लाईव्ह न्युज

09 November 2021

ट्रामा केअर सेंटर चंदगड शहरामध्ये व्हावे - नगरसेवक दिलीप चंदगडकर यांचे आमदारांना पत्र

चंदगड येथे ट्रामा केअर सेंटर व्हावे या मागणीचे निवेदन आमदार राजेश पाटील यांना देताना नगरसेवक दिलीप चंदगडकर 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         चंदगड या तालुक्याच्या ठिकाणी ट्रामा केअर सेंटर व्हावे अशी मागणी चंदगड नगरपंचायतीचे भाजपचे नगरसेवक दिलीप महादेव चंदगडकर यांनी चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील यांच्याकडे केली आहे. 
           तालुक्याच्या या मध्यवर्ती ठिकाणी कोणत्याही वैद्यकीय सेवा मिळत नाहीत. त्यासाठी सामान्य नागरिकांना कोल्हापूर किव्हा कर्नाटक बेळगांव या ठिकाणी जावे लागते. त्यामुळे काही रुग्ण हे दवाखान्यात जाण्या अगोदरच मृत्यू होतो. तसेच आरोग्य सुविधा साठी चंदगड तालुक्यात पासून प्रत्येक ठिकाण हे ५० कि.मी. पेक्षा जास्त आहे. तसेच चंदगड तालुक्याचा पश्चिम भाग हा डोंगराळ व मागास आहे आणि त्यांना दळणवळणाच्या सोयी पण नाहीत. त्यामुळे वैद्यकीय सेवा मिळणे खूप अवघड जाते. त्यामुळे चंदगड शहरात ट्रामा केअर सेंटर होणे गरजेचे आहे. चंदगड हे तालुक्याचे ठिकाण आहे या शहरामध्ये शासकीय कार्यालये, शाळा, कॉलेज आहेत. या शहराची लोकसंख्य १५ हजाराच्या बाहेर आहे. तसेच आजूबाजूला अनेक गावे असल्याने तसेच चंदगड नगरपंचायतीनेही आपल्या सभागृहात या विषयी चर्चा करून मासिक सभा दि. २१/०३/२०२० ला सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला आहे. तेव्हा चंदगड येथे ट्रामा केअर सेंटर मंजूर व्हावे, अशी मागणी भाजप नगरसेवक दिलीप चंदगडकर यांनी आमदारांना  निवेदनातून केली आहे. 

No comments:

Post a Comment