पंचवीस वर्षानंतर एकत्र येत वर्गमित्रांनी जपली सामाजिक बांधिलकी, वाचा सविस्तर....... - चंदगड लाईव्ह न्युज

12 November 2021

पंचवीस वर्षानंतर एकत्र येत वर्गमित्रांनी जपली सामाजिक बांधिलकी, वाचा सविस्तर.......

कालकुंद्री हायस्कूल आवारात १९९५ बॅचच्या विद्यार्थिनींनी वृक्षारोपण केले. सोबत शिक्षक.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

          कालकुंद्री (ता. चंदगड) येथील श्री सरस्वती विद्यालयात १९९५ मध्ये दहावीत शिकलेल्या विद्यार्थ्यांनी तब्बल पंचवीस वर्षांनी स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र येत सामाजिक बांधिलकी जपली. यात मुलीही मागे नव्हत्या.  केवळ गेट-टुगेदर साठी न जमता माध्यमिक विद्यालय व गावातील वाचनालयास सात हजार पाचशे रुपयांची पुस्तके तर प्राथमिक शाळेला पाच हजार रुपये किंमतीचे क्रीडासाहित्य भेट दिले. दरम्यानच्या काळात दिवंगत झालेल्या वर्गातील चार विद्यार्थी व एका विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना पंधरा हजार रुपये किंमतीचे गृहपयोगी साहित्य भेट दिले. आपल्याला घडविणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांना बोलावून त्यांचा आदर सत्कार बरोबरच शालेय परिसरात वृक्षारोपण केले. यावेळी वर्गातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या 'ऋणानुबंध' स्मरणिकेचे प्रकाशन शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले.

           कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तत्कालीन मुख्याध्यापक जी. एस. पाटील हे होते. प्रास्ताविक सर्जेराव पाटील यांनी केले. राजकुमार सावंत, रवींद्र पाटील व संतोष पाटील यांनी स्वागत गीत म्हटले. यावेळी रा. ना. पाटील, मुख्याध्यापक सुभाष बेळगावकर, के. जे. पाटील, विष्णू कार्वेकर, संतोष पाटील, रणजित कोले यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी वर्गातील सुमारे ६० विद्यार्थी-विद्यार्थिनी व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. शोभा पाटील यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment