ऊसतोड कामगारांच्या सोबत युवकांनी साजरी केली दिवाळी - चंदगड लाईव्ह न्युज

07 November 2021

ऊसतोड कामगारांच्या सोबत युवकांनी साजरी केली दिवाळी

लकी युथ फाऊंडेशनचे सदस्य ऊस तोड कामगारासोबत दिवाळी साजरी करताना.

तेऊरवाडी  एस. के. पाटील

      लकी युथ फाऊंडेशन तर्फे ऊसतोड कामगारांच्या व भटक्या विमुक्त समाजातील बांधवांच्या सोबत दिवाळी फराळ वाटप करून साजरी करण्यात आली. मजरे कारवे (ता. चंदगड) गावातील व पंचक्रोशीतील युवकांनी हा खारीचा वाटा उचलून नवा माणूसकीचा धागा जपला. मजरे कार्वे गावातून फराळ गोळा करून तो समाजातील ऊस तोड बांधवांपर्यंत पोचविण्याचा मानस येथील युवकांनी केला. गावातील प्रत्येक नागरिकांनी या उपक्रमासाठी आपला हातभार लावला असून तरुणांनी दिवाळीत वायफळ खर्च न करता केलेल्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

           गावातून जमा केलेला फराळ यशवंतनगर, मजरे कार्वे, पाटणे फाटा, व हलकर्णी येथील ऊसतोड कामगार व डोंबारी समाजातील साधारण २५० कुटुंबांना हा फराळ देण्यात आला. 

             यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष लखन बिर्जे म्हणाले की, दिवाळी हा खरतर दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघणारा सण आहे. हा सण अंधार दूर करून प्रकाशाची पाऊल वाट निर्माण करण्याची संधी देतो. हीच संधी आपल्या अवती भोवती जगणाऱ्या गोरगरिबांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणारी असावी म्हणून हा उपक्रम आम्ही हाती घेतला. त्याचबरोबर फाऊंडेशनचे उपाध्यक्ष भरतकुमार बोंगाळे म्हणाले की, माझा समाज सुजलम् सुफलम् व्हावा या इच्छे खातर आम्ही हा उपक्रम हाती घेतला असून असे अनेक उपक्रम आम्हाला करायचे आहेत.

           यावेळी फाऊंडेशनचे सचिव राजेंद्र इंजल, व सदस्य गजानन घाटगे, प्रमोद चांदेकर, अक्षय बोकडे, लक्ष्‍मण भोसले, अखीलेश बोकडे, रोहित र.बोकडे, अमोल आवडण, आनंद सुतार, राजेंद्र जो.बोकडे, कैलास बोकडे, संदेश गडकरी, अभिषेक गावडे, पांडुरंग बोकडे, ऋषभ बस्तवाडकर, रुपेश माऱ्यापगोल,आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment