कामेवाडी येथे 'जननायक- बिरसा मुंडा' जंयती उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

15 November 2021

कामेवाडी येथे 'जननायक- बिरसा मुंडा' जंयती उत्साहात

कामेवाडी येथे बिरसा मुंडा यांच्या जयंती प्रसंगी उपस्थित आदिवासी बांधव.


कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

          आदिवासी क्रांतिसूर्य, जननायक बिरसा मुंडा यांची जंयती आदिवासी पाडा कामेवाडी ता. चंदगड येथे उत्साहात  साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी महादेवकोळी जमात तालुका अध्यक्ष शिवलिंग डांगे होते. प्रतिमा पूजन राघोजी भांगरे  युवक मंडळ अध्यक्ष सुनिल पाटील यांनी केले. प्रस्ताविक तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी केले.

         क्रांतिकारक बिरसा मुंडा यांनी जुलमी इंग्रज सरकार विरूध्द सशस्त्र जनआंदोलन केले. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासींच्या सहभागाचे श्रेय त्यांनाच जाते. मूळनिवासी आदिवासींवरील अन्याय, अत्याचारा विरुद्ध पेटून उठणाऱ्या बिरसा यांना लोकांनी 'आदिवासी जननायक' उपाधी  दिली होती.

         इंग्रजांनी त्यांना ३ फेब्रुवारी १९०० रोजी चक्रधरपूर येथून अटक करून रांची तुरूंगात टाकले तेथेच त्यांचे वर्षभरात निधन झाले.  त्यांच्या स्मृती व सन्मानार्थ सरकारने रांची विमानतळ व तुरुंगाला बिरसा मुंडा यांचे नाव दिले आहे. 

      बिरसा यांच्या बंडातून प्रेरणा घेत चंदगड तालुक्यातील चिंचणे- कामेवाडीच्या आदिवासींनी १९२७ व १९३५ चा जंगल सत्याग्रह व १९४२ च्या स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला होता. यातील महादेवकोळी जमातीच्या अनेक आंदोलकांना अटक करून हिंडलगा- बेळगाव  कारागृहात डांबले होते.

      जयंती कार्यक्रम प्रसंगी प. के. पाटील, मुख्याध्यापक ब. शि. शिरगे, माजी उपसरपंच किरण पाटील, बसवाणी पाटील, ग्रामसेवक दुंडगेकर, पोलिस पाटील सौ. मुत्नाळे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन अनिल पाटील यांनी केले. महादेव व्हंकळी यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment