'गोड साखर' सुरू करा : साखर संचालक, जिल्हाधिकार्‍यांना शिवसेनेचे निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

15 November 2021

'गोड साखर' सुरू करा : साखर संचालक, जिल्हाधिकार्‍यांना शिवसेनेचे निवेदन

गोड साखर बाबत कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना शिवसेना पदाधिकारी.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

    आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी तथा गोड साखर कारखान्याचे धुराडे यंदा अद्यापि पेटलेले नाही. दरवर्षी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर पेटवणारे धुराडे अध्याप शांतच आहे. कारखाना तात्काळ सुरू करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशा आशयाचे निवेदन शिवसेना प्रणित सहकार सेनेच्या वतीने जिल्‍हाधिकारी व साखर सहसंचालकांना नुकतेच देण्यात आले.

            हा कारखाना चालवण्यास घेतलेल्या ब्रिक्‍स कंपनीने कारखाना सोडून पुन्हा संचालकांच्या ताब्यात दिला आहे. तथापि संचालकांना कारखाना सुरू करण्यात अपयश आले आहे. येथील बहुतांशी शेतकरी अल्पभूधारक असल्याने इतर कारखान्यांना ऊस देताना अडचणी येतात. सहा महिन्यापासून कारखाना कामगारांचा पगार थकित आहे. आजच्या घडीला कारखान्यावर ७० कोटी रुपयांचे कर्ज आहे. कारखाना बंद असल्याने यावर अवलंबून असणारे कामगार, ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, वाहनधारक तोडणी मजूर व व्यवसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत. परिसरातील इतर कारखाने सुरू होऊन महिना झाला तरी गोड साखर सुरू होण्याच्या हालचाली दिसत नाहीत. त्यामुळे हे सर्व घटक हतबल झाले आहेत. कारखाना सुरू झालाच नाही तर होणारे गंभीर परिणाम ओळखून साखर कारखाना सुरु करण्यासाठी साखर उपसंचालक, केडीसीसी बँक, कारखाना चेअरमन, संचालक मंडळ, अधिकारी व संबंधित शासकीय विभागांच्या प्रमुखांची बैठक बोलावून मार्ग काढून कारखाना सुरु करावा. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, शिव सहकार जिल्हाप्रमुख संजय जाधव, शिव सहकार सेना गडहिंग्लज तालुका संघटक अखलाक मुजावर, उपसंघटक अशोक खोत, महादेव शिंदे, कमलाकर रेडेकर, रवी साळोखे, आकाराम पाटील आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment