कर्यात भागात अचानक पाऊस, ऐन सुगीत शेतकऱ्यांची तारांबळ - चंदगड लाईव्ह न्युज

03 November 2021

कर्यात भागात अचानक पाऊस, ऐन सुगीत शेतकऱ्यांची तारांबळ

मळणी केलेले भात पिंजरातून बाहेर काढण्यासाठी सुरू असलेली धडपड.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

       मंगळवारी रात्री आठच्या सुमारास आलेल्या पावसामुळे कर्यात भागातील शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. ऐन सुगीच्या हंगामात आलेल्या पावसामुळे शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत.

           चंदगड तालुक्याच्या पूर्वेकडील 'किणी कर्यात' मधील कालकुंद्री, कुदनूर, कोवाड, निटूर, किणी आदी पंचवीस-तीस गावात भात कापणी, मळणी, उफणणी ची कामे जोरात सुरू आहेत. यातच अवकाळीच्या हजेरीमुळे कापलेली पिके भिजल्याने शेतकऱ्यांपुढे नवे संकट उभे राहिले आहे. गेले तीन-चार दिवस वातावरण ढगाळ होते पण रात्री प्रत्यक्ष पावसाने हजेरी लावलीच.

कापून जमा केलेले भात भिजू नये म्हणून तट्टाने झाकण्यासाठी शेतकऱ्यांची सुरू असलेली धावपळ

      सुगी हंगामातील पावसामुळे ग्रामीण भागात दिवाळी सणाचा उत्साह अभावानेच दिसत आहे. सध्या भात कापणीनंतर मसूर, वाटाणा, मोहरी, शाळू, हरबरा आदी खरीप पेरणीची धांदल सुरू आहे. यासाठी पाऊस मारक नसला तरी ऊस तोडणीवर मात्र परिणाम होणार आहे. याबरोबरच बालचमूंनी गेल्या आठ- पंधरा दिवसात रात्रंदिवस राबून तयार केलेल्या दिवाळीतील किल्ल्यांचे काही प्रमाणात नुकसान झाल्यामुळे बाल मंडळांचाही चांगलाच हिरमोड झाला आहे.

       दरम्यान आज दुपारी चार नंतर पुन्हा पाऊस सुरू झाल्याने बळीराजाच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे.

No comments:

Post a Comment