आसगोळी फाट्यावरील अपघातात सातवणेतील दोन महाविद्यालयीन युवक जागीच ठार, वाचा सविस्तर...... - चंदगड लाईव्ह न्युज

13 November 2021

आसगोळी फाट्यावरील अपघातात सातवणेतील दोन महाविद्यालयीन युवक जागीच ठार, वाचा सविस्तर......

जय जोतिबा मासरणकर                     अजित आप्पाजी पाटील


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
        नागनवाडी-गडहिंग्लज राज्यमार्गावर  आसगोळी  (ता. चंदगड)  फाट्यानजिक बेरहाळ्याजवळ ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात  सातवणे येथील जय जोतिबा मासरणकर (वय -१९) व अजित उर्फ भैय्या आप्पाजी पाटील (वय वर्षे -१८) या दोन महाविद्यालयीन युवकांचा जागीच मृत्यू झाला. हा भीषण अपघात सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडला. 
         यासंदर्भात पोलिसांतून मिळालेली माहीती अशी - अजित व जय हे आपल्या दुचाकी (क्र. एमएच ०७ एन ९४२९) वरून अडकुरहून इलेक्ट्रिक साहित्य घेऊन आपल्या सातवणे गावी येत होते. दरम्यान आसगोळी बेरहाळा पोल्ट्री फार्म जवळच्या एका अवघड वळणावर नागणवाडीहून अडकुरच्या दिशेने जाणारा ट्रकने (क्र. एमएच ०४- सीए -६१६८) दुचाकीला समोरून जोराची धडक दिली. धडकेने दुचाकीस्वार ट्रकच्या डिझेल टाकला धडकून रस्त्यावर पडले. दोघांच्याही डोकीवरून ट्रकचे चाक गेल्याने ते गंभीर जखमी झाले व  यामध्ये दोघांचाही जागीच त्यांचा मृत्यू झाला. जय हा दुचाकी चालवत होता तर अजित हा पाठीमागे बसला होता. 
        जय हा चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात बी. कॉमच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. तर अजित हा महागाव येथील कॉलेजमध्ये डिप्लोमाच्या द्वितीय वर्षात होता. जय याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. तर अजितच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे. अपघाताची वर्दी जोतीबा रूद्रापा मासरणकर (रा. सातवणे) यांनी चंदगड पोलिसात दिली असून ट्रक चालक शंकर विष्णू देसाई (रा. उचंगी, ता. आजरा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सतपाल कांबळे करत आहेत.


No comments:

Post a Comment