मांडेदुर्ग येथील बनावट दाखले प्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी - बीडीओंना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

15 November 2021

मांडेदुर्ग येथील बनावट दाखले प्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी - बीडीओंना निवेदन

बीडीओंना निवेदन देताना मांडेदुर्ग ग्रामस्थ.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        येत्या सेवा सोसायटीच्या निवडणुकीत मतदार वाढविण्यासाठी मृत्यु दाखल्यात खाडाखोड करून वारसदार केल्याचा प्रकार मांडेदुर्ग गावामध्ये समोर आला आहे. या प्रकरणी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आणि संगणक ऑपरेटर यांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी आज मांडेदुर्ग ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी चंदगड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

          मांडेदुर्ग गावामधील सेवा सोसायटीच्या निवडणूकीचा कार्यक्रम लागला आहे. ३० जुन २०१९ पूर्वी संस्थेचे जे सभासद आहेत त्यांनाच या निवडणुकीत मतदान करता येते. या निवडणुकीची प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर या यादीमधील काही मतदारावर हरकत घेण्यात आली होत्या. या हरकतीमध्ये सत्ताधारी गटाने काही मृत्यू झालेल्या सभासदांचे वारसदार हे २८/०६/२०१९ रोजी मिटिंग ठराव करून नेमले आहेत. यामधील काही वारसदारांची नेमणूक ही त्यांच्या मृत्यू पूर्वीच केल्याचे दिसून आले. याची सहकार संस्था कार्यालयातून कागदोपत्री माहिती घेतली असता यामधील काही मृत्यू दाखले हे बनावट असल्याचे निदर्शनास आले. या बनावट मृत्युदाखला प्रकरणाची गंभीर दखल घेवून याची रीतसर चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी संस्थेच्या सभासदांनी एका निवेदनाद्वारे गटविकास अधिकारी चंदगड यांच्याकडे आज केली. येत्या आठ दिवसांत दोषीवर जर कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा निवेदनाद्वारे इशारा देण्यात आला आहे.

           यावेळी नारायण दळवी, संभाजी टक्केकर, राजाराम गुंडप, वसंत पाटील, तानाजी टक्केकर, प्रा. भरमाना पाटील आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment