राजगोळी खुर्द येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रतीकात्मक उद्घाटन, १० जानेवारीपर्यंतचा अल्टिमेटम - चंदगड लाईव्ह न्युज

31 December 2021

राजगोळी खुर्द येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रतीकात्मक उद्घाटन, १० जानेवारीपर्यंतचा अल्टिमेटम

राजगोळी खुर्द येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रतिकात्मक उद्घाटन करताना संतोष मळवीकर, संदेश जाधव, भावकू गुरव आदी

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

           उद्घाटनाअभावी रखडलेल्या राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी गुरुवार दि. ३० रोजी प्रतीकात्मक उद्घाटन केले. यामुळे आरोग्य वर्तुळात खळबळ उडाली आहे. आरोग्य केंद्र १० जानेवारी पर्यंत पुरेशा कर्मचाऱ्यांसह सुरू न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा आंदोलकांच्या वतीने ॲड. संतोष मळवीकर, डॉ संदेश जाधव, भावकू गुरव आदींनी दिला आहे.

           लाखो रुपये खर्च करून दोन वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली सुसज्ज इमारत उद्घाटना अभावी ओस पडली आहे. गेल्या वर्षभरात समाजकंटकांकडून इमारतीची मोठ्या प्रमाणात नासधूस होत आहे. त्यामुळे पंधरा दिवसात आरोग्यसेवा न सुरू केल्यास उग्र आंदोलनाचा इशारा भाजपचे चंदगड तालुका युवा मोर्चा सरचिटणीस डॉक्टर संदेश जाधव व कार्यकर्त्यांनी दिला होता तथापि त्याची दखल घेण्यात न आल्यामुळे हे आंदोलन करण्यात आले.

        या आरोग्य केंद्रामुळे चंदगड तालुक्याच्या पूर्व भागातील कर्नाटक हद्दीलगत असलेल्या यर्तेनहट्टी, चन्नेटी, राजगोळी खुर्द, हेमरस साखर कारखाना, राजगोळी बुद्रुक, तिरमाळ, कामेवाडी, नरगट्टे, राजेवाडी, गणेशवाडी, तळगुळी, कुदनूर परिसरातील ग्रामस्थांची सोय होणार आहे. शासन व प्रशासनाची दिरंगाई अशीच सुरू राहिल्यास इमारत वापरण्यायोग्य राहणार नाही असे सांगून मळविकर व आंदोलकांनी  उद्घाटनाचे नारळ फोडले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ आर के खोत यांचा आंदोलकांना परावृत्त करण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला.

         उद्घाटनापूर्वी आरोग्य केंद्र प्रश्नासह या परिसरातील दुरावस्थेतील रस्ते, रस्त्यांच्या साईड पट्ट्या, रस्ते अपघातातील मृत्यूंना जबाबदार कोण? आदी मागण्यांसाठी राजगोळी बुद्रुक ते दड्डी मार्गावर काहीवेळ रास्ता रोको करण्यात आला. यावेळी एन. एस. पाटील, डॉ सुहास धबाले, सतीश निर्मळकर, दत्ता पाटील आदींसह सर्वपक्षीय कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment