कर्यात भागातील शेतकऱ्यांना 'अवकाळी'चा तिहेरी फटका! भात, कडधान्यांचे नुकसान, ऊस रखडले - चंदगड लाईव्ह न्युज

01 December 2021

कर्यात भागातील शेतकऱ्यांना 'अवकाळी'चा तिहेरी फटका! भात, कडधान्यांचे नुकसान, ऊस रखडले

             कालकुंद्री शिवारात उगवण झालेल्या मसूर पिकात पावसाचे पाणी साठल्यामुळे ही पिके नामशेष होणार आहेत.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

          गेल्या महिनाभरा पासून सुरू असलेल्या सततच्या अवकाळी पावसामुळे चंदगड तालुक्याच्या पूर्वेकडील कर्यात भागातील शेतकऱ्यांना तिहेरी नुकसानीचा फटका बसत आहे. निसर्गाच्या लहरीपणापुढे शेतकरी हतबल ठरले आहेत.

        महिन्यापूर्वी कापणीसाठी आलेली भात पिके अजूनही उभीच असल्यामुळे वटून गेली आहेत. लोंबू झडून मोठे नुकसान सुरू आहे. दुसरीकडे भात कापणी नंतर पेरलेली व उगवण झालेली मसूर, वाटाणा, मोहरी आदी रब्बीची पिके नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. सध्या साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू असले तरी सततच्या पावसामुळे ऊस तोडी रखडल्या आहेत. अशा तिहेरी संकटात येथील शेतकरी सापडला आहे.

           तालुक्यात माणगाव पासून पश्चिम भागातील दाटे, अडकूर, कानुर, चंदगड, हेरे परिसरात कापणी अभावी शिवारात उभ्या असलेल्या भात पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. सराई गेल्यामुळे या भातापासून तयार होणाऱ्या तांदळाची प्रत खालावण्याचा धोका निर्माण झाला आहे. यंदा पाऊस पाणी चांगला झाल्यामुळे सर्वच पिके चांगली आली होती त्यामुळे सुगीला बरकत येणार अशी स्वप्ने पाहणाऱ्या शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे.

No comments:

Post a Comment