र. भा. माडखोलकर ही एक चालती बोलती संस्था - प्रा. राजाभाऊ शिरगुप्पे, माडखोलकर महाविद्यालयात जयंती कार्यक्रम संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

02 December 2021

र. भा. माडखोलकर ही एक चालती बोलती संस्था - प्रा. राजाभाऊ शिरगुप्पे, माडखोलकर महाविद्यालयात जयंती कार्यक्रम संपन्न

र. भा. माडखोलकर

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

   र. भा. माडखोलकर सर ही केवळ एक व्यक्ती नव्हे तर चालती-बोलती संस्था होती. आपले इप्सित साध्य करण्यासाठी त्यांनी अपार मेहनत घेतली शिक्षण हे एक समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे हे त्यांच्या दूरदृष्टीला जाणवले होते. त्यांच्या अथक प्रयत्नामुळे चंदगड तालुक्यात सामाजिक अभीसरणाची प्रक्रिया गतिमान झाली. गरीब वंचित, दीनदलित व श्रमजीवी वर्गाला शोषणमुक्त करण्याचा विचार त्यांनी अत्यंत निष्ठेने आयुष्यभर जोपासला असे प्रतिपादन प्रा राजाभाऊ शिरगुप्पे यांनी केले ते येथील र. भा माडखोलकर महाविद्यालयाने आयोजित केलेल्या माडखोलकर सरांच्या  जयंती कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील होते.

माडखोलकर सरांच्या जयंतीदिनी बोलताना प्रा. राजाभाऊ शिरगुप्पे, शेजारी इतर मान्यवर.

    ते पुढे म्हणाले, ``माडखोलकर सरांनी महात्मा फुले यांचा मानवमुक्तीचा लढा पुढे नेण्याचे कार्य केले. त्यांची समर्पित वृत्ती आणि संघटन व प्रशासन कौशल्य यामुळेच चंदगड सारख्या दुर्गम डोंगराळ व मागास तालुक्यात शिक्षणाची गंगा अविरत वाहत राहिली.``

       अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांनी माडखोलकर सरांच्या विचारांचा वसा आणि वारसा टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येकाने कार्यरत राहण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमात दि. न्यू. इंग्लिश स्कूल व नं. भु. पाटील जूनियर कॉलेजचे प्राचार्य आर. आय.  पाटील, एस. आर. देशमुख, एल. डी . कांबळे यांनी मनोगते व्यक्त केली.

           प्रारंभी माडखोलकर सरांच्या समाधी स्थानी मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला व अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्रांतीगीताने झाली. प्रतिमा पूजन, दीपप्रज्वलन व नवागत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास महात्मा फुले विद्या विद्यालय कार्वेचे मुख्याध्यापक प्रा. एम. एम. गावडे, सह्याद्री विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश सातवलेकर,  हनुमान विद्यालय मांडेदुर्ग चे मुख्याध्यापक एम. एम.  कांबळे,  संस्थेचे इंजिनियर विक्रांत बांदिवडेकर, ॲड. आर. पी. बंदिवडेकर, अनंत सुतार यांच्यासह प्राध्यापक प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनींची लक्षणीय उपस्थिती होती. प्रास्ताविक प्रा. मासाळ यांनी तर सूत्रसंचालन प्रा. ए. डी. कांबळे व आभार प्रा. एस. बी. दिवेकर यांनी मानले.
No comments:

Post a Comment