अवकाळी पावसामुळे भाताला असे कोंब येवून नुकसान झाले आहे. |
निवृत्ती हारकारे / मजरे कार्वे
गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसाने चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. मोठ्या आस्मानी संकटाला बळीराजाला सामोरे जावे लागत आहे. सुगीच्या काळात संकट कोसळल्याने बळीराजा चिंतातुर बनला आहे.
भाताचे पिंजर भिजल्याने जनावारांच्या चाऱ्याचा प्रश्न उद्भवत आहे. |
सुगीची चाहूल लागली आणि शेतकऱ्यांची धांदल सुरू झाली. एकीकडे साखर कारखाने सुरू झाले तर दुसरीकडे रताळी, बटाटे काढणी हंगाम जोरात सुरू झाला. त्यानंतर खऱ्या अर्थाने भात कापणीने सूगीला सुरुवात होते. झालेही तसेच. दिवाळीपूर्वी काही शेतकऱ्यांनी सुगीला सुरुवात केली. भात कापणी करून मळणी काढायची तयारी झाली व अचानक पावसाच्या बातम्या येऊ लागल्या. सोशल मीडिया, टीव्हीवर पावसाच्या बातम्या धडकल्याने बळीराजाच्या पायाखालची वाळू घसरली. दिवाळीनंतर तरी या वातावरणातील बदल सुगी युक्त होईल अशा भाबड्या आशेने शेतकरीवर्ग आकाशाकडे डोळे लावून बसला होता. मात्र या संपूर्ण आशेवर पाणी फिरले आहे. गेल्या आठवडाभर पडत असलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. शेतात कापून आडवे केलेले भात व नाचणी यांना कोंब येत आहेत. तर वर्षभरासाठी जनावरांच्या पोटाची बेगमी करून ठेवण्यासाठी शेतकरी धडपडत असतो ते भाताचे पिंजर अक्षरशः कुजत चालले आहे. त्यामुळे इकडे आड आणि तिकडे विहीर अशा परिस्थितीत बळीराजा भरडला जात आहे.
या अवकाळी पावसाने भात नाचना पिकांचे नुकसान तर झालेच, मात्र ऊस पिकाला ही हानी पोहोचली आहे. तुटलेल्या खोडव्यावर बुरशी आल्याने खोडवा ऊगवनी वर त्याचा परिणाम होणार आहे. शिवारामध्ये पाणी साचल्याने पुढील दोन ते तीन महिने शिवारातील ऊस तोड होणार नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा परिणाम साखर कारखानदारीवर व शेतकऱ्यांवर होणार आहे.
कलीवडे, किटवडे, शेवाळे या भागात या पावसाबरोबरच हत्तीचे ही आगमन झाले आहे.त्यामुळे येथील शेतकरी भीतीच्या छायेखाली आहे. पावसातून तग धरून राहिलेले पिक या तस्करांच्या तडाख्यात सापडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समोर मोठे धर्मसंकट उभे ठाकले आहे.
शेतकऱ्यांचा वाली कोण?
या सगळ्या संकटांचा सामना करीत असलेल्या शेतकऱ्यांना शासनाने वाऱ्यावर सोडले आहे. पुराच्या तडाख्यातून खराब झालेल्या पिकांचे पंचनामे सुद्धा कंजूस पद्धतीने शासनाने केलेले आहेत. त्याची भरपाई अगदी नगण्य मिळाली आहे. सध्या या अस्मानी संकटामुळे जे नुकसान होत आहे, याची तरी दखल शासन दरबारी घेतली जाईल का? या विवंचनेत शेतकरी वर्ग आहे. शिवाजी महाराज यांच्या स्वप्नातील रयतेचे राज्य निर्माण होईल का? कोण आहे आम्हाला वाली? असे अनेक प्रश्न बळीराजाच्या समोर आ वासून उभे आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने या नुकसान ग्रस्तांची तत्काळ पंचनामे करून त्यांना भरघोस नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.या बाबतीत शासन स्तरावर अजून कोणतीही हालचाल नाही किंवा कोणतेही पंचनामे करण्याचे आदेश दिलेले नाहीत असे समजते.
No comments:
Post a Comment