कुदनूर स्मशानशेडमध्ये असुविधा! तरुणांनी राबवली स्वच्छता मोहीम - चंदगड लाईव्ह न्युज

17 December 2021

कुदनूर स्मशानशेडमध्ये असुविधा! तरुणांनी राबवली स्वच्छता मोहीम

हंदिगनूर मार्गावरील स्मशान शेडची स्वच्छता करताना कुदनूर येथील तरुण.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

          चंदगड तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून ओळख असलेल्या कुदनूर येथील स्मशान शेड मध्ये सुविधांची वानवा आहे. लोकसंख्येच्या मानाने एका दाहीनीचे शेड अपुरे पडत असून दुसऱ्या शेडची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

         गावापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर हांदिगनूर रस्त्यानजीक असलेल्या स्मशान शेडमध्ये वीज, पाणी, संरक्षण भिंत, उभे राहण्यासाठी सुरक्षित जागा यांची वाणवा आहे. पावसाळ्यात अंत्यविधी वेळी चिखलात तर उन्हाळ्यात तळपत्या उन्हात उभे राहावे लागत असल्याने नागरिकांची कुचंबणा होत आहे. त्यातच शेडच्या आजूबाजूस वाढलेली काटेरी झाडे झुडपे धोकादायक ठरत होती. हे ओळखून गावातील तरुणांनी स्वयंस्फूर्तीने स्मशान शेडचा परिसर नुकताच स्वच्छ केला. यात मारुती सरमळकर, बाळू मोरे, चंद्रकांत कोकितकर, चिंतामणी मल्हारी, वैजनाथ निर्मळकर, संजय परीट, हुवाप्पा परीट आदींचा समावेश होता.

   गावची लोकसंख्या आणि विस्तार पाहता एक शेड अपुरे पडत आहे. गावातील ७५ टक्के अंत्यसंस्कार आपापल्या शेतात केले जातात. तथापि पावसाळ्यात यावरही मर्यादा येतात. त्यामुळे गावाच्या दुसऱ्या दिशेला दोन जाळ्यांचे आणखी एक स्मशान शेड उभारावे तसेच आहे त्या शेडसाठी संरक्षण भिंत बांधणे, सभोवताली पेविंग ब्लॉक बसवणे, पाणी व रात्रीच्या वेळी कायमस्वरूपी विद्युत दिव्यांची सोय करावी. अशी ग्रामस्थांतून मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment