राजगोळी खुर्द प्राथमिक आरोग्य केंद्राची उद्घाटनापूर्वीच नासधूस, केंद्र सुरू करण्याची भाजपची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

06 December 2021

राजगोळी खुर्द प्राथमिक आरोग्य केंद्राची उद्घाटनापूर्वीच नासधूस, केंद्र सुरू करण्याची भाजपची मागणी

राजगोळी खुर्द आरोग्य केंद्र इमारतीची उद्घाटनापूर्वीच समाजकंटकांनी केलेली नासधूस

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

          लाखो रुपये खर्च करून दोन वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची सुसज्ज इमारत उद्घाटना अभावी ओस पडली आहे. गेल्या वर्षभरात समाजकंटकांनी मोठ्या प्रमाणात इमारतीची नासधूस केली आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभाग मार्फत येथे स्टाफ नेमून पंधरा दिवसात आरोग्यसेवा न सुरू केल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपचे चंदगड तालुका युवा मोर्चा सरचिटणीस डॉक्टर संदेश जाधव व कार्यकर्त्यांनी दिला आहे.

इमारतीला लावलेल्या काचा अशा फुटल्या आहेत. 

       चंदगड तालुक्याच्या पूर्व भागातील कर्नाटक हद्दीलगत असलेल्या यर्तेनहट्टी, चन्नेटी, राजगोळी खुर्द, हेमरस साखर कारखाना, राजगोळी बुद्रुक, तिरमाळ, कामेवाडी, नरगट्टे, राजेवाडी, गणेशवाडी, तळगुळी, कुदनूर परिसरातील ग्रामस्थांना कोवाड प्राथमिक आरोग्य केंद्राचे अंतर अधिक आहे. याचा विचार करून कोल्हापूर जि. प. ने  राजगोळी खुर्द येथे नवीन आरोग्य केंद्र मंजूर केले. यासाठी लाखो रुपये खर्च करून सुसज्ज इमारत बांधून दोन वर्षापूर्वी तयार आहे. तथापि आरोग्य केंद्र सुरू करण्याच्या कोणत्याच हालचाली दिसत नाहीत. तालुका भाजपच्या वतीने याप्रश्नी दोन महिन्यापूर्वी आंदोलनही छेडण्यात आले होते. कोवीड काळात या इमारतीचा वापर पॉझिटिव्ह रुग्ण ठेवण्यासाठी करण्यात आला होता. अलीकडच्या काही दिवसात समाजकंटकांनी या इमारतीच्या खिडक्यांच्या काचा, विद्युत साहित्य, दरवाजे, खिडक्या, ग्रील, रंगकाम आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. याबाबत ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे. आणखी काही दिवस हिच स्थिती राहिल्यास इमारत वापरण्यायोग्य राहणार नाही. अशी चर्चा ग्रामस्थांतून होत आहे. हे ओळखून जि. प. आरोग्य विभागाने येथे वैद्यकीय अधिकारी व पुरेसा कर्मचारी वर्ग नेमून आरोग्य सेवा सुरु करावी व परिसरातील गोरगरीब जनतेला दिलासा द्यावा. अन्यथा याप्रश्नी उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपच्या वतीने देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment